मुंबई

मुंबईसाठी 'मध्यम' हवेची गुणवत्ता नको; प्रदूषण नियंत्रणावर हायकोर्टाने BMC ला फटकारले

मुंबई शहरासाठी केवळ ‘मध्यम’ हवेची गुणवत्ता त्यांना मान्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबईतील हवेच्या प्रदूषणाबाबत स्वतःहून (स्यू मोटो) दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मंगळवारी न्यायालयाने फटकारले.

उर्वी महाजनी

मुंबई : मुंबई शहरासाठी केवळ ‘मध्यम’ हवेची गुणवत्ता त्यांना मान्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबईतील हवेच्या प्रदूषणाबाबत स्वतःहून (स्यू मोटो) दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मंगळवारी न्यायालयाने फटकारले. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) न्यायालयाला दिली.

मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्या. श्याम सुमन यांच्या खंडपीठाने शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत विचारणा केली असता मुंबई मनपाचे वकील एस. यू. कामदार यांनी, ‘ती मध्यम आहे,’ असे उत्तर दिले. त्यावर खंडपीठाने मिश्कील पण स्पष्ट शब्दांत, आम्हाला ‘मध्यम’ नको, असे म्हटले.

बीएमसीच्या ‘समीर एक्यूआय’ अ‍ॅपनुसार गेल्या आठवड्यात मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स १०१ ते ११६ दरम्यान होता, जो ‘मध्यम’ श्रेणीत मोडतो. मात्र या पातळीवर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले.

पर्यावरण व हवामान बदल विभागाचे मुख्य अभियंता अविनाश काते यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून प्रदूषणविरोधी मार्गदर्शक तत्त्वांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी उचललेल्या पावलांचा तपशील दिला. उच्च न्यायालयाच्या “प्रदूषण पातळीत घट झाल्याचे ठोस व मोजता येतील असे परिणाम” दर्शविणारा अहवाल सादर करण्याच्या निर्देशानुसार मुंबई मनपाने पुढील १५ दिवसांसाठी आणि त्यानंतरही लागू राहील, असा कृती आराखडा तातडीने कार्यान्वित केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले.

न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाची दखल घेत शहरातील बांधकाम स्थळांवर ‘लक्ष केंद्रीत पाठपुरावा तपासण्या आणि अंमलबजावणीची कारवाई’ करण्यात आल्याचे सांगितले.

समितीच्या सूचनांनुसार ८ जानेवारी रोजी ‘रस्ते आणि पूल बांधकामांसाठी मुंबई वायुप्रदूषण शमन आराखड्याची अंमलबजावणी’ या शीर्षकाची स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात आली.

मनपाने सांगितले की, मुंबईत हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी वाढते आणि पावसाळ्यात घटते, असा सातत्यपूर्ण हंगामी नमुना दिसतो. ‘हवामान, प्रदूषकांचे प्रसारण आणि उत्सर्जन क्रियाकलापांची पातळी यांच्या संयुक्त प्रभावाचे हे प्रतिबिंब आहे,’ असे नमूद करण्यात आले.

थंड तापमान, तापमान उलटसुलट (इन्व्हर्जन), उभ्या मिश्रणात घट तसेच बांधकाम आणि वाहतूक उत्सर्जन ही एक्यूआय वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचेही नमूद केले.

मुंबईचे किनारी स्थान, समुद्र-भूमी वाऱ्यांची चक्राकार हालचाल आणि हंगामी वाऱ्यांची दिशा बदल यांचा शहराच्या हवेवर मोठा प्रभाव असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे “हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन हे केवळ शहरकेंद्रित उपायांपुरते मर्यादित न ठेवता एअरशेड-आधारित, बहु-कार्यक्षेत्रीय समन्वयातून करणे आवश्यक आहे. स्थानिक तसेच प्रादेशिक उत्सर्जन स्रोतांवर समन्वित नियंत्रण ठेवले तरच वातावरणातील हवेच्या गुणवत्तेत शाश्वत सुधारणा शक्य आहे,’ असे ३१५ पानी प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले.

मुंबई मनपाने दावा केला की, २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये ‘एक्यूआय’मध्ये २२ टक्के आणि २०२५ मध्ये २६ टक्के सुधारणा झाली आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातंर्गत मुंबईत २०१७ या आधार वर्षापासून ‘पीएम१०’ पातळीत लक्षणीय घट झाल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘प्राणा क्लीन एअर पोर्टल’वरील आकडेवारीनुसार दिसून येते, असेही सांगण्यात आले.

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

२९ पैकी १५ ठिकाणी महिला महापौर; महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा लिस्ट

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

Republic Day Alert: '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी