मुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे कामानिमित्त लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.
या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.३४ ते सायंकाळी ४.३६ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.
चर्चगेट, मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गांवरील गाड्या धीम्या मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकावरून शॉर्ट टर्मिनेट/रिव्हर्स केल्या जातील.