Mumbai : पाणी तुंबण्याची समस्या दूर होणार; मिलन सबवेच्या धर्तीवर मानखुर्द सबवेत पंपिंग स्टेशन उभारणार, १४ कोटी खर्च करणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पाणी तुंबण्याची समस्या दूर होणार; मिलन सबवेच्या धर्तीवर मानखुर्द सबवेत पंपिंग स्टेशन उभारणार, १४ कोटी खर्च करणार

मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर भुयारी मार्गात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलसाठ्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर भुयारी मार्गात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलसाठ्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. हिंदमाता आणि मिलन सबवेप्रमाणे या ठिकाणी भूमिगत संप पिट (टाकी) आणि मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असून साचलेले पावसाचे पाणी थेट ठाणे खाडीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

मानखुर्द सबवे हा ३१५ कॅचमेंट क्षेत्रातील सर्वाधिक खोलगट भाग असून या भागाचा उतार ठाणे खाडीकडे आहे. त्यामुळे हलक्या पावसातही येथे पाणी साचण्यास सुरुवात होते. परिणामी पूर्व-पश्चिम वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या या ठिकाणी पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात विविध क्षमतेचे दहा पंप बसवले जातात. मात्र, ही व्यवस्था अपुरी ठरत असल्याने पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर, एम/पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कायमस्वरूपी योजनेसाठी मिनी पंपिंग स्टेशनची मागणी केली होती.

प्रमुख कामे

  • २.२६ मीटर आकाराचे संप पिट उभारणे.

  • संप पिट ते ठाणे खाडीदरम्यान १२०० मिमी व्यासाची ४३० मीटर लांबीची मृदू पोलादी वाहिनी टाकणे.

  • ताशी ३००० घनमीटर क्षमतेचे तीन पंप भाडेतत्त्वावर बसवून २०२६ ते २०२९ या कालावधीत त्यांचे संचालन व देखभाल करणे.

  • प्रकल्पासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा खर्च

खोल संप पिट उभारणार

पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने केलेल्या पाहणीनंतर या ठिकाणी १५ मीटर लांब, ६ मीटर रुंद आणि २.२६ मीटर खोल संप पिट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संप पिटमध्ये उच्च क्षमतेचे पंप बसवून साचलेले पाणी १२०० मिमी व्यासाच्या मृदू पोलादी वाहिनीद्वारे सुमारे ४३० मीटर अंतरावरील ठाणे खाडीत सोडण्यात येणार आहे.

पंप भाडेतत्त्वावर बसवणार

पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या नियोजनानुसार, ताशी १०० मिमी पावसाची तीव्रता गृहीत धरल्यास मानखुर्द सबवे परिसरात सुमारे १२ हजार घनमीटर पाण्याचा निचरा आवश्यक ठरतो. त्यानुसार येथे ताशी ३००० घनमीटर क्षमतेचे तीन उच्च क्षमतेचे पंप भाडेतत्त्वावर बसवण्यात येणार आहेत. या पंपांचे संचालन व देखभाल पुढील चार वर्षे म्हणजे २०२६ ते २०२९ या कालावधीत करण्यात येणार आहे.

वाहतूक सुरळीत होणार

या कामासाठी कंत्राटदाराची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून म्हाळसा कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मानखुर्द सबवेतील जलसाठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात एकनाथ खडसेंचे मोठे योगदान; राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

Mumbai : डीआरआयची आंतरराष्ट्रीय सोने तस्करांच्या टोळीवर मोठी कारवाई; १०.७५ कोटींचे सोने जप्त, सहा जणांना अटक

गेटवे-मांडवा जलवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; AIPA ची सुरक्षित जलवाहतुकीची मागणी

समृद्धी महामार्गालगत CNG पाइपलाईनला गळती; धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांचा भार

भारतीय मानक वेळ अनिवार्य करणारे नियम सरकारकडून जारी; अंमलबजावणीसाठी १८० दिवसांची मुदत