मुंबई

दिवस मेट्रो बिघाडाचा! ‘मेट्रो-३’, मेट्रो-२ए’ व ‘मेट्रो-७’मध्ये बिघाड

‘कुलाबा-वांद्रे- सिप्झ’ या ‘मेट्रो-३’ मार्गिकेवरील ट्रेनमध्ये शुक्रवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाला. यामुळे प्रवाशांना सांताक्रुझ स्थानकावर उतरविण्यात आले, तर सायंकाळी ‘मेट्रो-२ए’ आणि ‘मेट्रो-७’ मार्गावरील सेवाही सुमारे तासभर विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे शुक्रवार हा ‘मेट्रो’ बिघाडाचा दिवस ठरला.

Swapnil S

मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे- सिप्झ’ या ‘मेट्रो-३’ मार्गिकेवरील ट्रेनमध्ये शुक्रवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाला. यामुळे प्रवाशांना सांताक्रुझ स्थानकावर उतरविण्यात आले, तर सायंकाळी ‘मेट्रो-२ए’ आणि ‘मेट्रो-७’ मार्गावरील सेवाही सुमारे तासभर विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे शुक्रवार हा ‘मेट्रो’ बिघाडाचा दिवस ठरला.

‘मेट्रो-३’ मार्गिकेचा शेवटचा टप्पा ८ ऑक्टोबरला प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. यासाठी मेट्रो ट्रेन कफ परेडपर्यंत चालविण्यात येत आहे. आचार्य अत्रे चौक स्थानकाच्या दिशेने जाणारी ट्रेन सांताक्रुझ स्थानकाजवळ दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी पोहचताच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून गाडीतील प्रवाशांना सांताक्रुझ स्थानकावर उतरविण्यात आले. यानंतर ही गाडी रद्द करून बीकेसी लूपलाइनवर नेण्यात आल्याने या गाडीच्या दिवसभरातील सेवा रद्द करण्यात आल्या.

दरम्यान, पावसाळ्यात मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यावर उन्नत मार्ग असलेली ‘मेट्रो-२ए’ आणि ‘मेट्रो- ७’ मार्गावरील सेवा सुरळीत सुरू असल्याचा बडेजाव करणारे महामुंबई मेट्रो प्रशासन शुक्रवारी चांगलेच तोंडावर आपटले. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा ‘मेट्रो-२ए’ आणि ‘मेट्रो-७’ मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. सुमारे तासभर मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यामुळे प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला.

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत होते. यादरम्यान प्रवाशांचे हाल होतात. याकाळात मेट्रो सेवा सुरळीत सुरू असल्याचा बडेजाव करणाऱ्या महामुंबई मेट्रोची सेवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असताना प्रशासन केवळ सोशल मीडियावर ट्विट करून स्वतःचे समाधान करत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने मेट्रो सेवा विस्कळीत होत आहे. आजही ऐन गर्दीच्या वेळी ‘मेट्रो-२ए’ आणि ‘मेट्रो-७’ची सेवा विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.

मेट्रो बंद झाल्याने मेट्रो स्थानकांचे गेट बंद करण्यात आल्याचे ट्विट प्रवाशांनी केले. मात्र, महामुंबई मेट्रो प्रशासनाने सोशल मीडियावर ट्विट करत काही तांत्रिक अडचणीमुळे ‘लाईन २-ए’ आणि ‘लाईन-७’वर धावणाऱ्या मेट्रो सेवांमध्ये किंचित विलंब होत असल्याचे जाहीर केले. तसेच प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी औपचारिकता दाखवली.

लहान मुलांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार अलर्ट! ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी; नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

अमेरिकेत आणखी एक भारतीय ठार; डलासमध्ये विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; 'या' दिवसांमध्ये बाहेर पडताना घ्या काळजी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी

'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन