मुंबई मेट्रो मार्गिका २ए आणि ७ या दोन्ही मार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. या दोन मार्गांवर १२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत सकाळच्या मेट्रो सेवांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहेत. हे बदल तात्पुरते असून या काळात सकाळच्या मेट्रो सेवा काही मिनिटांनी उशिरा सुरू होतील, अशी माहिती महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. मेट्रो मार्गिका ७ आणि मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा) या दोन मार्गिकांच्या एकत्र जोडणीचे काम, अत्यावश्यक प्रणाली एकीकरण तसेच सुरक्षा चाचण्या पार पाडण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
या काळात पहिल्या मेट्रोच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी सुधारित वेळापत्रक -
डहाणूकरवाडी ते गुंदवली
सोमवार-शुक्रवार : सकाळी ०७:०१
शनिवार : ०७.००
रविवार : ०७.०४
डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम
सोमवार-शुक्रवार : ०७:०६
शनिवार : ०६:५८
रविवार : ०६:५९
दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम
सोमवार - शुक्रवार : ०६:५८
शनिवार - रविवार : ०७:०२
दहिसर पूर्व ते गुंदवली
सोमवार- शुक्रवार : ०६:५८
शनिवार : ०७:०६
रविवार : ०७:०१
अंधेरी पश्चिम ते गुंदवली
सोमवार - शुक्रवार : ०७:०१
शनिवार : ०७:०२
रविवार : ०७:०४
महा मुंबई मेट्रोने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना MumbaiOne App तसेच मेट्रोच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेस आणि स्थानकांवरील माहिती फलक तपासावेत. सर्व नियमित सेवा १९ ऑक्टोबर २०२५ पासून पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
अंधेरी ते मिरा-भाईंदर जोडणीसाठी तयारी
ही तांत्रिक कामं अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदरदरम्यान मेट्रो अशा सलग जोडणीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा असून, लवकरच प्रवाशांना या सेवांतून अमर्याद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार aslyअसल्याचे महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने सांगितले आहे.
'रेड लाईन एक्स्टेन्शन’चा निर्णायक टप्पा
‘रेड लाईन एक्स्टेन्शन’ प्रकल्पांतर्गत मार्गिका ९ चे काम अंतिम टप्प्यात आहे. २३ सप्टेंबर रोजी RDSO (Research Design and Standards Organisation) ची तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आता Independent Safety Assessor (ISA) चाचण्या आणि ट्रायल रन सुरू आहेत. ही सर्व चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुंदवली ते मिरा रोड दरम्यान अखंड मेट्रो सेवा सुरू होणार आहे.