मुंबई

आता ‘भुयारी रोड नेटवर्क’; सुमारे ७० किलोमीटर लांबीचा भूमिगत कॉरिडॉर; DPR बनविण्याची प्रक्रिया सुरू

शहर आणि उपनगरातील वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Swapnil Mishra

मुंबई : शहर आणि उपनगरातील वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रस्ते जाळे, मेट्रो रेल्वेसोबत आता भुयारी रोड नेटवर्क हे मुंबईसाठी तिसरे प्रवासाचे माध्यम ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत, मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-२) यांना जोडणारा सुमारे ७० किलोमीटर लांबीचा भूमिगत कॉरिडॉर उभारण्याचा एमएमआरडीएचा संकल्प आहे.

यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एस. व्ही. रोडवरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भूमिगत मार्गामुळे वाहतुकीवरील दाब कमी होईल. अवजड वाहनांची हालचाल भुयारी रस्ता मार्गे वळवली जाईल. यामुळे शहरात वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे. सुमारे ७० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. या माध्यमातून रस्ते आणि मेट्रो यांना पूरक असे एकत्रित वाहतूक नेटवर्क तयार होईल, ज्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होऊन प्रदूषणात घट होणार आहे.

मुंबईतील दाटीचे बांधकाम व मर्यादित जागा लक्षात घेता, भूमिगत मार्ग ही वाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी व्यवहार्य पर्याय ठरणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी वाहतुकीच्या आवश्यकतांनुसार व भविष्यातील मागणी लक्षात घेऊनच टप्प्याटप्प्याने केली जाईल. प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० सप्टेंबर रोजी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी टेक्नो-इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी आणि डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार निविदा १० ऑक्टोबर रोजी काढण्यात आली असून, १७ ऑक्टोबर रोजी प्री-बिड मीटिंग घेण्यात आली, तर १७ नोव्हेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत.

भुयारी रस्ता नेटवर्कच्या अंमलबजावणीचे टप्पे

  • पहिला टप्पा : वरळी सी लिंक- बीकेसी- विमानतळ लूप (सुमारे १६ किमी) मुंबई कोस्टल रोडला बीकेसी आणि विमानतळाशी जोडणारा मार्ग, तसेच मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरशी एकत्रित होणारा भाग. या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग व एस.व्ही. रोडवरील कोंडी कमी करण्यावर भर असेल.

  • दुसरा टप्पा: पूर्व-पश्चिम जोडणी (सुमारे १० किमी)पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडून क्रॉस-शहर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करणे.

  • तिसरा टप्पा: उत्तर-दक्षिण जोडणी (सुमारे ४४ किमी)संपूर्ण मुंबईभर अखंड भूमिगत मार्ग तयार करून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी नवी जोडणी उभारणे.

“भुयारी रस्ता नेटवर्कमुळे मुंबईतील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. हे नेटवर्क विद्यमान रस्त्यांवरील ताण कमी करून पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जोडणी सशक्त करेल. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. ज्यामध्ये तांत्रिक व्यवहार्यता, पर्यावरणीय परिणाम आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा सखोल अभ्यास केला जाईल. डीपीआर अंतिम होऊन मंजूर झाल्यानंतर, प्रकल्पाची अंमलबजावणी वाहतुकीच्या गरजेनुसार आणि भविष्यातील वाढत्या मागणीच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. हे नेटवर्क ‘मुंबई इन मिनिट्स’ या संकल्पनेला मूर्त रूप देईल. जिथे रस्ते, मेट्रो, कोस्टल आणि भुयारी रस्ता या चार स्तरांमधील समन्वयामुळे अखंड, जलद आणि शाश्वत प्रवास शक्य होईल.
डॉ. संजय मुखर्जी - आयुक्त, एमएमआरडीए

मविआत फुट? काँग्रेस BMC निवडणूक स्वबळावर लढणार; विजय वडेट्टीवार म्हणाले, "मनसेसोबत...

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला; १२२ जागांसाठी उद्या मतदान

निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात! जमीन घोटाळ्यावरून अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर; सत्य लवकरच बाहेर येईल!

शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग; डांबर काढणी पूर्ण; पर्यायी मार्गाची दुरुस्तीही युद्धपातळीवर

Thane : भटक्या कुत्र्यांची दहशत; उपचारापेक्षा वेदना भयंकर