मुंबई : मुंबईत एका ४५ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने रविवारी दिली. या वृत्ताने परिसरात व पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी दुपारी अंधेरी परिसरात ही घटना घडली. मृत पोलीसाने आत्महत्या करण्याइतपत टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी (पूर्व) येथील न्यू पोलीस लाईन्समधील आपल्या निवासस्थानी कॉन्स्टेबल मुकेश दत्तात्रेय देव गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
त्यांना तत्काळ कूपर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दाखल करून घेण्यापूर्वीच त्यांना मृत म्हणून घोषित केले, असे अंधेरी पोलिसांनी सांगितले.
मुकेश देव हे मरोळ येथील स्थानिक शस्त्रास्त्र विभागात कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.