पूनम अपराज
मुंबई : मुंबईत मोठ्या उत्साहात साजरी होणारी नवरात्र कोणतीही अनुचित घटना न घडता शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. दुर्गा मंडप आणि गरबा-दांडियाच्या ठिकाणांवर विशेष खबरदारी घेतली जात असून प्रामुख्याने महिला आणि मुलांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे.
उत्सवादरम्यान छेडछाड किंवा तत्सम प्रकार रोखण्यासाठी आयोजकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मंडळ सदस्यांना मंडळांवरील सुरक्षा उपायांबाबत माहिती देण्यात आली आहे, तर ९ दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान पोलीस कर्मचारी नियमित गस्त घालणार आहेत. सण शांततेत आणि शिस्तीत पार पाडावा, यासाठी पोलिसांनी मिरवणुकांबाबतही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दहशतवाद्यांच्या रडारवर असलेल्या मुंबईत सणासुदीच्या काळात सुरक्षेची चिंता वाढते, कारण अशा वेळी धोके वाढण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर, रविवारपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवात कोणतीही अनुचित घटना टळण्यासाठी पोलीस पूर्णपणे सज्ज झाले आहेत.
सदस्यांसोबत बैठका
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनी उत्सव मंडळांचे सदस्य, समाजसेवक, राजकीय नेते आणि बिगर-सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेतल्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांना केले आहे.
संवेदनशील भागात रात्रीची गस्त
पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित व्यक्ती आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांची माहिती गोळा केली असून शांतता भंग करू शकणाऱ्या कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांना ताकीद दिली आहे. संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन आणि रात्रीची गस्त घालण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, २४ तास स्वयंसेवक तैनात करा!
मंडळांमध्ये होणाऱ्या दागिन्यांच्या चोऱ्या व इतर घटना रोखण्यासाठी सर्व मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या आणि २४ तास स्वयंसेवक तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच रात्रीच्या वेळी मंडळांवर स्वयंसेवक किंवा खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्याचे निर्देश आयोजकांना देण्यात आले आहेत. संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गरबा-दांडिया आणि नवरात्रीच्या इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी साध्या वेशात पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत.