अवधूत खराडे/मुंबई
मुंबईत गेल्या तीन वर्षांत खुनाच्या घटनांमध्ये झालेली घट २०२५ मध्ये उलटली असून, हत्यांच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच एनसीआरबी आणि मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शहरात २०२२ मध्ये १३५ आणि २०२३ मध्ये १२४ खुनाचे गुन्हे नोंदवले गेले होते.
२०२४ मध्ये हा आकडा १०७ पर्यंत खाली आला होता, परंतु २०२५ मध्ये यात अचानक वाढ होऊन तब्बल १२६ खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. वैयक्तिक वैमनस्य, कौटुंबिक वाद आणि क्षुल्लक कारणांवरून होणारे हिंसक हल्ले या वाढीमागे मुख्य कारण असल्याचे समोर आले असून यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.
या गुन्हेगारीत महिला बळींचे प्रमाण लक्षणीय असून २०२४ मधील १०७ हत्यांपैकी २५ पीडित महिला होत्या. अपयशी प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, कौटुंबिक भांडणे आणि आर्थिक विवंचनेतून या हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. चालू वर्षातही ३१ मार्चपर्यंत मुंबईत दोन महिलांसह ३९ खुनाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत, जे गेल्या वर्षाच्या याच काळातील ३४ गुन्ह्यांपेक्षा पाचने जास्त आहेत. २०२४ च्या आकडेवारीनुसार कौटुंबिक आणि किरकोळ वादामुळे सर्वाधिक प्रत्येकी २३ हत्या झाल्या. पैशांच्या वादातून ७, तर अनैतिक संबंधातून ६ गुन्हे घडले. बळी पडलेल्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील तरुण आणि काही बालकांचाही समावेश आहे.
मुंबई शहरात केवळ खूनच नव्हे, तर खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मुंबईत २०२२ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याची २४४ प्रकरणे समोर आली होती, जी २०२३ मध्ये २९२ आणि २०२४ मध्ये ३०३ पर्यंत वाढली. २०२५ मध्ये हा आकडा ३२४ वर पोहोचला. यंदाच्या वर्षात ३१ मार्चपर्यंतच पोलिसांनी तब्बल १०० गुन्हे नोंदवले असून, गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ६९ गुन्ह्यांच्या तुलनेत ही संख्या खूपच मोठी आहे. पोलिसांकडून या सर्व प्रकरणांचा कसून तपास सुरू आहे.
आर्थिक विवंचनेतूनही गुन्ह्यांमध्ये वाढ
मुंबई शहरात वैयक्तिक वाद, संशय आणि आर्थिक विवंचनेतून होणाऱ्या हिंसक गुन्ह्यांच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली आहे. माहीम येथे मद्यधुंद अवस्थेत असल्यावरून झालेल्या वादातून २० वर्षीय साहिल जावेद खान या तरुणाला ६ जणांच्या टोळीने बेदम मारहाण करून ठार केले, तर दुसऱ्या एका घटनेत डॉकयार्ड रोड परिसरात आर्थिक वादातून अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या कथित माजी साथीदाराच्या समीर आसिफ शेख या मुलावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाला आहे.
प्रेमसंबंधातूनही हत्येच्या घटना
कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांतील संशयातूनही हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. मुलुंडमध्ये पत्नीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरून ४२ वर्षीय व्यक्तीने एकाची भोसकून हत्या केली, तर वडाळा येथे मूळ गावातील प्रेमसंबंधांच्या वादातून सुरक्षा रक्षकाने सहकाऱ्यावर लोखंडी गतीने हल्ला करून त्याला संपवले. शहरात किरकोळ कारणांवरून आणि तत्कालिक रागातून हत्या करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरून माहीममध्ये एका ३९ वर्षीय व्यक्तीला बांबूने मारहाण करून ठार मारण्यात आले, तर कुर्ला येथे रिक्षात बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात १७ वर्षांच्या मुलाने रिक्षाचालकाची भोसकून हत्या केली.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
भांडुपमध्ये तीन अल्पवयीन शाळकरी मुलांनी आपल्याच १४ वर्षीय वर्गमित्राची हत्या करून त्याचा मृतदेह विहार तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याच परिसरात २५ जानेवारी २०२६ रोजी शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली या तरुणावर गजबजलेल्या रस्त्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने २९ वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या सर्व घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलीस तपास करत आहेत.