अवधूत खराडे
मुंबई : विक्रोळी पश्चिम येथील एलबीएस (एलबीएस) मार्गावर १८ सप्टेंबर रोजी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामादरम्यान बसवण्यात दुभाजकाजवळ आलेले एक लोखंडी बॅरिकेड चालत्या दुचाकीवर कोसळल्याने ५४ वर्षीय प्लंबरचा मृत्यू झाला.
वासी हैदर रिझवी (५४) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते घाटकोपर पश्चिम येथील गोसिया चाळीत राहत होते. रिझवी हे सकाळी ९.३० च्या सुमाराला कामासाठी घरातून निघाले होते. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास रोझरी इमारतीसमोरून मुलुंडच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. मेट्रोच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या दुभाजकाजवळ ठेवलेले एक लोखंडी बॅरिकेड रिझवी यांच्या दुचाकीवर पडले. यात ते गंभीर जखमी झाले आणि बॅरिकेडखाली अडकले. अपघाताची माहिती मिळताच पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रिझवी यांना तातडीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
कंत्राटदाराचा हलगर्जीपणा
रिझवी यांचा मुलगा अली रझा याने दिलेल्या तक्रारीवरून पार्कसाईट पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एलबीएस मार्गावरील मेट्रो बांधकामाचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स बसवताना आणि त्यांची देखभाल करताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेण्यात आली नव्हती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. साईट सुपरवायझरच्या निष्काळजीपणामुळे हे बॅरिकेड रिझवी यांच्यावर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी प्रोजेक्ट डायरेक्टर, मॅनेजर, साईट सुपरवायझर आणि संबंधित कंपनीला जबाबदार धरण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.