Mumbai : विरार-चर्चगेट लोकलमध्ये राडा; दोन प्रवाशांच्या भांडणात भिरकावलेला चाकू लागून भलताच प्रवासी जखमी, आरोपी अटकेत  (Photo-X)
मुंबई

Mumbai : विरार-चर्चगेट लोकलमध्ये राडा; दोन प्रवाशांच्या भांडणात भिरकावलेला चाकू लागून भलताच प्रवासी जखमी, आरोपी अटकेत

लोकल अंधेरी स्थानकाजवळून जात असताना दोन व्यक्तींमध्ये वाद सुरू होता. याच वादातून त्यापैकी एका व्यक्तीने चाकू फेकला. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना धावत्या विरार-चर्चगेट जलद लोकलमध्ये घडली. दोन व्यक्तींमधील वादातून भिरकावलेला चाकू थेट एका ५३ वर्षीय प्रवाशाच्या छातीत घुसला. रविवारी (दि. १५) अंधेरी स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेत सुरेश शर्मा हे प्रवासी जखमी झाले. या प्रकरणातील आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वांद्रे स्थानकात लोकल थांबवली

मिळालेल्या माहितीनुसार, विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल (गाडी क्रमांक ९०४२२) दुपारी सुमारे १२.२१ वाजता वांद्रे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर थांबवण्यात आली. लोकलची साखळी ओढण्यात आल्याने गाडी थांबली होती. त्यावेळी कर्तव्यावर असलेले मुख्य गार्ड योगेश्वर सिंह झाला यांनी गार्डच्या केबिनपासून दुसऱ्या डब्यात जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना सुरेश शर्मा (५३) हे प्रवासी छातीच्या उजव्या बाजूला रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत आढळले.

दोन व्यक्तींमधील वादातून चाकू फेकला

चौकशीदरम्यान जखमी सुरेश शर्मा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. शर्मा हे मूळचे झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या मुंबईतील सायन-धारावी परिसरात राहतात. सुतारकाम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. लोकल अंधेरी स्थानकाजवळून जात असताना दोन व्यक्तींमध्ये वाद सुरू होता. याचदरम्यान त्यापैकी एकाने दुसऱ्या व्यक्तीच्या दिशेने चाकू भिरकावला. मात्र, हा चाकू त्या व्यक्तीला न लागता दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीत घुसला. यात ते गंभीर जखमी झाले.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणातील आरोपीची ओळख शिवा गायकवाड (२५) अशी पटली आहे. तो विनातिकीट प्रवास करत होता. मूळचा नाशिकचा रहिवासी असलेल्या गायकवाड याला घटनेनंतर वांद्रे रेल्वे स्थानकात शासकीय रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यात आले, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, जखमी सुरेश शर्मा यांना उपचारांसाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! पुलावरून बस थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी

कचऱ्यावर प्रक्रिया करा वा पैसे भरा! पात्र बल्क वेस्ट जनरेटर्ससाठी प्रतिमहिना २३५ रुपये प्रस्तावित; मुंबई महापालिकेची माहिती

Nashik : निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ओझरमध्ये १०.५ अंश तापमान

५० टक्के जागा वाढवल्यास मतदारसंघ फेररचनेला पाठिंबा; राष्ट्रवादी पवार गटाचा पुनरुच्चार

फोर्स वन आता ATS च्या नियंत्रणाखाली; दहशतवादी हल्ल्यांचा काही वेळातच खात्मा