Mumbai : विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवक पद धोक्यात (Photo-X)
मुंबई

Mumbai : विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवक पद धोक्यात

शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. पालघर जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची घोषणा सोमवारी सभागृहात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विशाख राऊत या कट्टर शिवसैनिक असून त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले तर ठाकरे सेनेसाठी मोठा धक्का मानला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये दादर प्रभाग क्रमांक १९१ या महिला ओबीसी प्रभागांमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र सादर केले होते. राऊत यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यात असल्यामुळे त्यांनी पालघर येथून आपले वडील व आजोबांचे ओबीसी प्रमाणपत्र मिळवले होते. या ओबीसी प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले होते. परंतु हे प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार पालघर जात पडताळणी समितीकडे शिंदे शिवसेनेच्या उमेदवार प्रिया सरवणकर यांनी केली होती. त्यावर शुक्रवारी जात पडताळणी समितीने राऊत यांचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले आहे.

शिंदे सेनेच्या दबावामुळे प्रमाणपत्र रद्द : विशाखा राऊत

राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याची प्रत सोमवार पर्यंत मुंबई महापालिकेकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारीच महापालिका सभागृहामध्ये त्यांचे पद रद्दबातल    झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना विशाखा राऊत यांनी शिवसेनेच्या दबावामुळे आपले जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप केला आहे. आपण सुरुवातीपासून ओबीसी प्रवर्गात होतो. पालघर जिल्ह्यात माझे मूळ गाव असून आम्ही ओबीसी असल्याचे प्रमाणपत्र माझे वडील, आजोबांकडे १९२७ च्या पूर्वीपासून आहे. त्याच आधारावर आपल्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे हे प्रमाणपत्र आपण निवडणुकीमध्ये सादर केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोकण भवन आयुक्तांकडे दाद मागणार

जात पडताळणी समितीने आपले नगरसेवक पद रद्दबातल केले असले तरी, कोकण भवन अंतर्गत महसूल समितीकडे तीन महिन्यांपर्यंत अपील करण्याची मुभा आहे. तीन महिन्यांनंतर जो काही निर्णय येईल, त्यावर कोर्टात जायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आतापर्यंत चार नगरसेवक अपात्र

जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मुंबई महापालिकेतील आतापर्यंत चार नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भांडुप येथील प्रभाग १११ मधील नगरसेवक दीपक सावंत, एआयएमआयएमचे गोवंडी येथील प्रभाग १३७ मधील समीर रमजान पटेल, प्रभाग १३८ मधील रोशन शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कुर्ला पूर्व येथील प्रभाग १७० मधील बुशरा नदिम मलिक यांचा समावेश आहे.

हे सर्व नगरसेवक आरक्षित प्रवर्गातून निवडून आले होते. संबंधित जिल्हा जात पडताळणी समित्यांनी त्यांची जातवैधता प्रमाणपत्रे अवैध ठरवल्यानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. दरम्यान, या निर्णयांविरोधात काही नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

आत्महत्येची धमकी देणाऱ्या मुलासह आई-वडिलांचा मृत्यू; उंच कड्यावरून तिघेही कोसळले, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Mumbai : एफडीएचा 'दणका'! सहा आस्थापनांचे परवाने, नोंदणी प्रमाणपत्र रद्द; रेडिओ क्लब, स्टेटस, खार जिमखान्यावर कारवाई

पॅलेट गनप्रकरणी गुन्हा दाखल; राहुल गांधींच्या सहा तासांच्या ठिय्या आंदोलनाला यश

Mumbai : कुर्ल्यात क्रेन कोसळून १० जखमी; कंत्राटदाराला २५ लाखांचा दंड; MMRDA ची कारवाई

विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरुष) : भारतीय पुरुष हॉकी संघाची आज डच टेस्ट