Mumbai : मान्सूनच्या विलंबामुळे चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील साठा १३.५५ टक्क्यांवर (Photo - FPJ)
मुंबई

Mumbai : मान्सूनच्या विलंबामुळे चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील साठा १३.५५ टक्क्यांवर

मुंबईत १९ ऑगस्टपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा राखण्यासाठी BMC ने १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठा आता धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. उशिरा येणाऱ्या मान्सूनमुळे तलावांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा १,९६,१४१ दशलक्ष लिटर (ML) इतकाच शिल्लक राहिला असून तो एकूण क्षमतेच्या केवळ १३.५५ टक्के आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ६ जूनच्या आकडेवारीनुसार, तलावांची एकूण पूर्ण साठवण क्षमता (FSL) १४,४७,३६३ ML इतकी आहे. विशेष म्हणजे, अपर वैतरणा तलावातील उपयुक्त पाणीसाठा पूर्णपणे संपुष्टात आला आहे.

१० टक्के पाणी कपात सुरूच

मुंबईत १९ ऑगस्टपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा राखण्यासाठी BMC ने १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र, मान्सून अजून मुंबईत दाखल न झाल्याने चिंता अधिक वाढत आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (MMR) हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी शहरात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. उलट, मुंबईत उकाडा आणि दमट हवामान कायम आहे.

दररोज ४,००० दशलक्ष लिटर पाण्याचा वापर

मुंबई शहराला मोडक सागर, तानसा, भातसा, तुळशी, विहार, अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा या सात तलावांमधून दररोज सुमारे ४,००० ML पाणीपुरवठा केला जातो.

सध्याचा पाणीसाठा किती?

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर आणि अपर वैतरणा या तलावांतील एकत्रित पाणीसाठा ९०,४७९ ML इतका आहे. हा त्यांच्या एकूण उपयुक्त साठवण क्षमतेच्या १३.०३ टक्के आहे.

यामध्ये मोडक सागर तलावात सर्वाधिक ४३,२६० ML म्हणजेच ३३.५५ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. त्यानंतर मध्य वैतरणामध्ये ३४,५७३ ML म्हणजे १७.८६ टक्के साठा आहे.

तानसा तलावात १२,६४६ ML म्हणजे ८.७२ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर अपर वैतरणा तलावातील उपयुक्त पाणीसाठा पूर्णपणे शून्यावर पोहोचला आहे.

विहार तलावात सर्वाधिक टक्केवारी

इतर तलावांमध्ये विहार तलावात सर्वाधिक ४४.२४ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला असून तेथे १२,२५४ ML पाणी उपलब्ध आहे.

तुळशी तलाव २५.७३ टक्के क्षमतेवर असून तेथे २,०७० ML पाणी उपलब्ध आहे. तर भातसा तलावात ९१,३३७ ML म्हणजे १२.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

अपर वैतरणातून पाणी सोडणे बंद

BMC ने दिलेल्या माहितीनुसार, मध्य वैतरणा तलावातून ३० नोव्हेंबर २०२५ पासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, अपर वैतरणा तलावातून २ जून २०२६ पासून पाणी सोडणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

तलाव परिसरात पावसाची प्रतीक्षा

सातही तलावांच्या परिसरात अजून समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. मान्सून हंगाम सुरू झाल्यापासून तानसा तलाव परिसरात केवळ १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून आणखी लांबल्यास मुंबईसमोरील पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Maratha Reservation : आंदोलन रोखण्यास न्यायालयाचा नकार

१६० फेरीवाल्यांचे बस्तान उठवले; कांदिवली फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा; आकुर्ली रोड, डॉ. दळवी रोड अतिक्रमणमुक्त