मुंबई : व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी व्यक्तींना आता हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यासाठी थेट वरळी जेट्टीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वरळी जेट्टीवर हेलिपॅड उभारण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.
वरळी जेट्टी येथे हॅलिपॅड उभारणीचे संकेत राज्य सरकारने दिले होते. आता प्रत्यक्षात वरळी जेट्टी येथे हॅलिपॅड उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाच्या कामादरम्यान वरळी जेट्टीसमोर तात्पुरती जेट्टी उभारण्यात आली होती. कोस्टल रोडचे बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतर या जेट्टीचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीने हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करून हेलिकॉप्टरच्या लँडिंग आणि टेकऑफची व्यवस्था केली जाणार आहे.
आपत्कालीन सेवांसाठीही हेलिपॅडचा वापर
या हेलिपॅडचा वापर केवळ व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींच्या व्यावसायिक हेलिकॉप्टर सेवांसाठीच होणार नसून, वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवांसाठीही करता येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), मुंबई अग्निशमन दल, पोलीस तसेच अन्य सरकारी यंत्रणांना आवश्यकतेनुसार या सुविधेचा वापर करता येईल. नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना किंवा बचावकार्याच्या वेळी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तातडीने मदत पोहोचविण्यास या सुविधेचा उपयोग होणार आहे.
रेमंडकडे संपूर्ण जबाबदारी
हेलिपॅडचे बांधकाम, विकास, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी रेमंड लिमिटेडवर राहणार आहे. हेलिपॅड सुरू करण्यापूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) आवश्यक मान्यता, वैधानिक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य तांत्रिक सुविधा उभारण्याची जबाबदारीही कंपनीवर असेल.
पालिकेच्या तिजोरीत दरमहा पाच लाख
या प्रकल्पातून मुंबई महापालिकेला दरमहा किमान पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. कंपनीकडून दरमहा एक लाख रुपये निश्चित शुल्क देण्यात येईल. त्याशिवाय व्यावसायिक हेलिकॉप्टरच्या लँडिंग आणि टेक-ऑफमधून मिळणाऱ्या महसुलातील ५० टक्के हिस्सा किंवा किमान चार लाख रुपये प्रतिमहिना, यापैकी जी रक्कम अधिक असेल ती पालिकेला द्यावी लागणार आहे.
हवाई वाहतुकीला नवे केंद्र उपलब्ध
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाच्या विकासापासून संचालनापर्यंतची जबाबदारी रेमंड लिमिटेडकडे सोपविण्यात आली आहे. त्यासाठी कंपनीसोबत १५ वर्षांचा करार करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे मुंबईच्या हवाई वाहतुकीला नवे केंद्र उपलब्ध होणार आहे.