मुंबई

मुंबईत दोन दिवस यलो अलर्ट; २४ तासांत राज्यात २ जणांचा मृत्यू, ३ जनावरे दगावली

मे महिन्याच्या अखेरीस बरसणाऱ्या पावसाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांकडे पाठ फिरवली असली तरी रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक ७०.४ मिमी पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असून पुण्यात वीज पडून एकाचा, तर छत्रपती संभाजी नगरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : मे महिन्याच्या अखेरीस बरसणाऱ्या पावसाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांकडे पाठ फिरवली असली तरी रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक ७०.४ मिमी पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असून पुण्यात वीज पडून एकाचा, तर छत्रपती संभाजी नगरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. तसेच तीन जनावरे दगावल्याचे राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले. पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून उद्या रविवारी सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईत पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

यंदा वरुणराजाचे वेळेआधीच आगमन झाले. २४ मे रोजी केरळात, तर महाराष्ट्रात २५ मे रोजी पावसाची एंट्री झाली. मान्सूनची लवकर एंट्री झाल्याने जून महिना पाऊस गाजवणार असा अंदाज होता. मात्र २४ ते २८ मेपर्यंत पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून २९ जणांचा मृत्यू झाला. परंतु जूनच्या सुरुवातीपासून पावसाने ब्रेक घेतला असून १४ जूननंतर राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मात्र कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागात पावसाची अधूनमधून जोरदार इनिंग सुरू आहे.

२४ तासांतील पावसाची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

दोघांवर उपचार सुरू

ठाणे जिल्ह्यातील तुर्भे एमआयडीसी येथे जनरेटरच्या धुरामुळे त्रास झालेल्या २८ लोकांपैकी २६ व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, तर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

देहू, आळंदीत एसडीआरएफ, एनडीआरएफ टीम तैनात

आषाढवारीनिमित्ताने इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) एक पथक देहू येथे तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक आळंदी येथे तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेड अलर्ट

सिंधुदुर्ग

यलो अलर्ट

मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे घाट, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा

ऑरेंज अलर्ट

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल