मुंबई

राणीच्या बागेत होणार मत्स्यजीवांचे दर्शन; पालिका उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय

बच्चे कंपनीसह मोठ्यांचेही मनोरंजन करणाऱ्या राणीच्या बागेत म्हणजेच भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : बच्चे कंपनीसह मोठ्यांचेही मनोरंजन करणाऱ्या राणीच्या बागेत म्हणजेच भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. हे मत्स्यालय पेंग्विन कक्षाजवळच तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे व आकाराचे मासे पाहता येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन एकूण ७० कोटी खर्च करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

राणी बागेतील इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या तळमजल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर याची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन मासे तसेच जलचरांच्या प्रजातींची संख्या वाढविणे शक्य आहे. यानुसार मत्स्यालयाची संकल्पना मांडण्यात आली होती. मागवलेल्या निविदेमध्ये एस. के. एस. कारकाला ही कंपनी पात्र ठरली. या प्रकल्पासाठी विविध करांसह तब्बल ७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कंपनीने कुर्ला नेहरू नगर येथील महापालिका शालेय इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम केले आहे. परंतु या कंपनीने मत्स्यालय बनवणाऱ्या कंपन्यांशी करार केल्यामुळे निविदा अटींमध्ये ही कंपनी पात्र ठरल्याने याची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

असे असेल मत्स्यालय

या मत्स्यालयाच्या बांधकामामध्ये घुमटाकार मत्स्यालय, पद भ्रमण बोगदा मत्स्यालय, पॉप-अप विंडो आदींची सुविधा असेल. आयताकृती आणि वर्तुळाकार टाक्या बोगद्या मत्स्यालयाव्यतिरिक्त, या मत्स्यालयात ॲक्रिलिक पॅनल्समध्ये बनवलेले ४ आयताकृती टाक्या, ५ वर्तुळाकार टाक्या आणि ०२ अर्धगोलाकार टाक्या बनवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये विविध प्रकारचे मत्स्यजीव प्रदर्शित केले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जलचरांसाठी मत्स्यालयाअंतर्गत नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी कृत्रिम रॉक वर्कची व्यवस्था करण्यात येणार आहे.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध