मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी २० टक्के सानुग्रह अनुदान किंवा बोनस द्यावा. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगार-कर्मचारी संघटनांनी पालिका प्रशासन तसेच राज्य सरकारकडे केली आहे.
दि म्युनिसिपल मजदूर युनियनने याबाबत पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे. तर, म्युनिसिपल मजदूर संघाने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना साकडे घालून पालिका आयुक्तांनाही निवेदन दिले आहे.
म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी म्हटले आहे की, येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी पालिका कर्मचार्यांना २०२४ चा २० टक्के
दिवाळी बोनस, सानुग्रह अनुदान अधिक ४० हजार रुपये जाहीर करण्यात यावेत. तसे साकडे त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना घातले आहेत. सध्याच्या महागाईचा विचार करता पालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांना हा बोनस आणि अधिकची रक्कम देण्यात यावी. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी बोनसचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेने कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना वर्षानुवर्षे सातत्याने, विनाखंड सानुग्रह अनुदान दिलेले आहे. त्या यंदासुद्धा ही मागणी मान्य झाली पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी यावर पालिका प्रशासनाने चर्चा करून निर्णय घ्यावा, त्यासाठी तातडीने कामगार संघटनांबरोबर बैठक घ्यावी.
रमाकांत बने, सरचिटणीस, दि म्युनिसिपल युनियन.