मुंबई : गारेगार व आरामदायी प्रवासासह प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बेस्ट परिवहन विभागाने बेस्ट बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र. साडेचारशे हून अधिक बसेस मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेस्ट सह प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
बेस्ट उपक्रमाने बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रीक एसी बसेसचा समावेश केला. अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील अशा २,८८९ बसेस प्रवासी सेवेत धावतात.
स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसेसच्या माध्यमातून दररोज ३१ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. कुर्ला पश्चिम येथे बेस्ट बसला अपघात झाला ती बस भाडेतत्त्वावरील होती. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसेस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे बेस्ट सह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने बेस्ट उपक्रमाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद
दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या सगळ्यांचं बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे स्पष्टीकरण बेस्ट उपक्रमाने दिले आहे.