अमित श्रीवास्तव/मुंबई
ऑनलाइन फार्मसीचा झपाट्याने होणारा विस्तार, मोठ्या सवलती आणि घरपोच सेवा यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हजारो पारंपारिक औषध विक्रेते (केमिस्ट) गंभीर व्यावसायिक संकटात सापडले आहेत. याच्या निषेधार्थ किरकोळ औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ७,००० नोंदणीकृत फार्मसी व औषध दुकाने आहेत. यापैकी अनेकांनी गेल्या काही वर्षांत विक्री आणि ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे नोंदवले आहे. ऑनलाइन फार्मसीने आधीच १० टक्के बाजारपेठ काबीज केली असून त्यांची वाढ झपाट्याने सुरू आहे, असा आरोप रिटेल अँड डिस्पेंसिंग केमिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव अजय जोशी यांनी केला आहे. कॉर्पोरेट पाठबळ असलेल्या ई-फार्मसी कंपन्या किरकोळ विक्रेत्यांना व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी प्रचंड तोटा सोसून औषधे विकत आहेत.
प्रिस्क्रिप्शन औषधांच्या ऑनलाईन विक्रीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. "ज्या औषधांसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शन) गरज असते, ती ऑनलाइन विकली जाऊ शकतात का, यावर कोणतेही योग्य नियंत्रण नाही. शेड्युल एच, एच वन आणि एक्समधील औषधे केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारेच दिली जाऊ शकतात. परंतु, अनेक प्लॅटफॉर्म केवळ टेलिफोनिक सल्ल्यानंतर त्यांची विक्री करत आहेत. कॉल करणारा व्यक्ती पात्र डॉक्टर आहे की केवळ टेलि-कॉलर, हे कोण तपासणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र राज्य औषध विक्रेते आणि औषधनिर्माण शास्त्रज्ञ संघटनेचे सरचिटणीस अनिल नवंदर यांनी आरोप केला की, ऑनलाईन फार्मसीच्या वाढीमुळे बाजारपेठेत बनावट औषधे येण्याचा धोकाही वाढला आहे.
"ऑनलाईन फार्मसींना परिणामांकडे लक्ष देण्यापेक्षा नफा कमावण्यात जास्त रस आहे. नैराश्य (डिप्रेशन) आणि झोपेशी संबंधित विकारांवरील औषधे योग्य प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाईन विकली जात आहेत. काही अनियंत्रित प्लॅटफॉर्म योग्य वैद्यकीय तपासणीशिवाय ही औषधे सहज उपलब्ध करून देत आहेत," असा आरोप नवंदर यांनी केला.
जोशी म्हणाले की, ग्राहकांना कमी किमतींचा फायदा होत असला तरी, अनेक अनियंत्रित ऑनलाईन प्लॅटफॉर्म कथितरीत्या बनावट आणि मुदत संपत आलेली औषधे बाजारपेठेत ढकलत आहेत. ते पुढे म्हणाले, "ऑनलाईन औषधे खरेदी करणे सोपे आहे, परंतु त्यांची गुणवत्ता तपासणे आणि ती परत करणे खूप कठीण आहे. डेटाची गोपनीयता हा दुसरा पैलू आहे, जो भविष्यात सर्वात मोठा धोका ठरू शकतो."
दरम्यान, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) ने ऑनलाईन फार्मसीच्या वाढत्या वर्चस्वाचा निषेध करण्यासाठी आणि या क्षेत्राच्या कडक नियमनाची मागणी करण्यासाठी २० मे २०२६ रोजी देशभर एक दिवसीय औषध दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
नफा घटला
देशभरात २०० हून अधिक ऑनलाइन फार्मसी कंपन्या कार्यरत असून, सोय आणि कमी किमतींमुळे ग्राहक वाढत्या प्रमाणात डिजिटल खरेदीकडे वळत आहेत. किरकोळ औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, या ट्रेंडमुळे औषध दुकानांमधील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे आणि आधीच कमी असलेला नफा अधिकच रोडावला आहे.