Mumbai : ऑरेंज गेट टनेल प्रकल्पाला वेग; २५० मीटर भूमिगत बोगद्याचे खोदकाम यशस्वीरीत्या पूर्ण 
मुंबई

Mumbai : ऑरेंज गेट टनेल प्रकल्पाला वेग; २५० मीटर भूमिगत बोगद्याचे खोदकाम यशस्वीरीत्या पूर्ण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कुलाबा येथील ऑरेंज गेट भूमिगत रस्ता बोगदा प्रकल्पात एक मोठा अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कुलाबा येथील ऑरेंज गेट भूमिगत रस्ता बोगदा प्रकल्पात एक मोठा अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे. अत्याधुनिक स्लरी शिल्ड टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) तंत्रज्ञानाचा वापर करून अंदाजे २५० मीटर भूमिगत बोगद्याचे खोदकाम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. त्यासोबत कायमस्वरूपी सेगमेंटल टनेल लाइनिंग रिंग्सची उभारणीही पूर्ण केली आहे.

दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एमएमआरडीएने कुलाबा येथे ऑरेंज गेट टनेल प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा मार्ग मुंबईतील सर्वाधिक पायाभूत सुविधा-संवेदनशील नागरी क्षेत्रातून जात असून विद्यमान युटिलिटीज आणि दाट बांधकाम क्षेत्राखाली अत्यंत अचूक उत्खननाची आवश्यकता आहे तसेच भूपृष्ठावरील शहराच्या दैनंदिन कार्यात कोणताही अडथळा येऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे.

'अशी' आहे बोगद्याची रचना

या प्रकल्पाचा बोगदा खोदकामासाठी विशेषतः उच्च क्षमता स्लरी शिल्ड टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. या मशीन १२.१९ मीटर व्यासाचा कटर हेड आणि सुमारे २,४०० टन वजनाची आहे. या प्रकल्पात अंदाजे ४.८ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यांसह सिंगल कॅरेजवे टनेल निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक बोगद्यात दोन वाहतूक मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहे. कार्यक्षम वाहतूक प्रवाहासाठी ८० किमी प्रतितास वेगमयांदा निर्धारित करण्यात आली आहे तसेच अधिक सुरक्षितता आणि आपत्कालीन प्रवेशासाठी प्रत्येक ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेज असणार आहेत. जमिनीखालून जवळपास ५० मीटर खोलीपर्यंत बोगद्याची रचना आहे.

बहुआयामी गतिशीलता नेटवर्क

मुंबईची भविष्यातील गतिशीलता पायाभूत सुविधा केवळ भूपृष्ठीय विस्तारापुरती मर्यादित राहू शकत नाही. शहराची उभी आणि आर्थिक वाढ जसजशी होत आहे तसतसे भूमिगत संपर्क नेटवर्क गतिशीलता कार्यक्षमता आणि शहरी लवचिकता टिकवण्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहेत. ऑरेंज गेट टनेल प्रकल्प हा केवळ वाहतूक मार्ग नसून मुंबई महानगर प्रदेशासाठी बहुआयामी गतिशीलता नेटवर्क निर्माण करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक बदल आहे, असे उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईतील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प

मुंबई आता पायाभूत सुविधा विकासाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे.' पाताळ लोक रोड नेटवर्क' या टनेल रोड नेटवर्कद्वारे अधिक वेगवान, अधिक जोडलेले आणि भविष्याभिमुख मुंबई घडवण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टनेल लाइनिंग रिग्सची निर्मिती

सध्या या प्रकल्पाचे २५० मीट रपेक्षा अधिक बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. पूर्ण झालेल्या बोगद्यांमध्ये कायमस्वरूपी सेगमेंटल लाइनिंग रिंग्सची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे तर प्रिकास्टिंग अंतर्गत जवळपास ४,६०० अभियांत्रिकी प्रिकास्ट कॉंक्रिट सेगमेंट्सपासून ५७५ पेक्षा अधिक टनेल लाइनिंग रिंग्सची निर्मिती करण्यात आली आहे.

...तर कंत्राटी कर्मचारी नियमित नियुक्तीचा हकदार बनत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

प्रभाग समित्यांवर बिगर सरकारी प्रतिनिधी; १४ वर्षांनंतर संघटनेचे प्रतिनिधी प्रभाग समित्यांवर

Mumbai : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ब्लॉक

मीरा-भाईंदरमधील २५४ एकर जमीन सरकारीच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, जमीन बिल्डरला देण्याच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

Pune : शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक