मुंबई : मालाड येथे एका विशेष मोहिमेअंतर्गत १३हून अधिक अल्पवयीन बाल भिक्षेकरूंची मुंबई पोलिसांच्या विशेष बाल पोलीस कक्षाने सुटका केली. याप्रकरणी चार महिलांना पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर या चौघांनाही पुढील कारवाईसाठी बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मालाड येथे रस्त्यावर काही अल्पवयीन मुलांना भिक्षा मागण्यास प्रवृत्त केले असून भिक्षा मागणारी ही एक सराईत टोळी असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोतदार व त्यांच्या पथकाने तिथे एका विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या ३ ते १५ वयोगटातील १३ अल्पवयीन मुलांची सुटका केली. या अल्पवयीन मुलांना भिक्षा मागण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चार महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध बाल न्याय अधिनियम कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अटकेनंतर या चारही महिलांना गुरुवारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुटका केलेल्या मुलांची मेडिकलनंतर मानखुर्द येथील बाल कल्याण समिती कार्यालयात रवानगी करण्यात आली आहे.