मुंबई

बाळासाहेबांच्या नावाने सत्ता गाजवली मात्र मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

येत्या निवडणुकीत भाजप अशा लोकांना आपली जागा दाखवून देईल,” असे फडणवीस म्हणाले.

प्रतिनिधी

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मुंबईवर सत्ता गाजवली, त्यांनी मुंबईकडे कधीही लक्ष दिले नाही. काही लोकांसाठी मुंबई म्हणजे केवळ मलई होती. सामान्यांच्या नावाखाली मुंबई पालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आला; मात्र मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजप अशा लोकांना आपली जागा दाखवून देईल,” असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, ‘‘क्षेत्रीय अस्मितेला भाजपमध्ये वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मराठी असल्याचा आम्हालाही अभिमान आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी व्यक्तीलाही मराठीचा अभिमानच वाटतो; मात्र काही पक्ष केवळ मराठी माणसाच्या नावावर राजकारण करतात. शिवसेनेने मराठी माणसासाठी काहीही केले नाही. शिवसेनेने मुंबईची स्वप्ने धुळीस मिळवली. बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसाबाबत, मुंबईत जी स्वप्ने होती, ती सर्व स्वप्ने शिवसेनेने धुळीत मिळवली. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद फक्त भाजपकडे आहे.’’

मुंबई पालिकेत बहुमत मिळवू

“मुंबई पालिकेत भाजप आणि शिवसेनेचा भगवा फडकेल; पण शिवसेना कोणती तर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करणारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची असेल. आपला स्ट्राईक रेट दुपटीपेक्षा अधिक झाला आहे. गेल्या निवडणुकीत ३५ वरून आपण ८३ वर गेलो. आता तोही विक्रम मोडायचा आहे. २०-२० खेळून मुंबई विकास लीग आपल्याला जिंकायची आहे,” असे ते म्हणाले.

धारावीचा पुनर्विकास प्रश्न तीन महिन्यांत सुटेल

धारावी पुनर्विकासाचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार येत्या तीन महिन्यांत सोडवेल. चिंता करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. “आपण मराठीच्या नावावर मत मागणारे नाही, तर मराठीची सेवा करणारे लोक आहोत. भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबई महापालिकेला बाहेर काढावेच लागेल. सामान्य मुंबईकरांना त्यांचा हक्क देणारे प्रशासन मुंबई महापालिकेत द्यावे लागेल. जशी-जशी निवडणूक जवळ येईल, तसे भावनिक आवाहन वेग घेईल. मुंबई महाराष्ट्रातून तोडण्याचा डाव, अशी विधाने येतील. मुंबई तोडण्याची कुणाची हिंमत नाही,” असे फडणवीस म्हणाले.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब