मुंबई

मुंबई, पुण्यासाठी खूशखबर! बदलापूर ते कर्जत तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला मंजुरी; पुणे मेट्रोच्या 'फेज २'चा विस्तार होणार

पुणे मेट्रोच्या फेज -२ कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून या प्रकल्पामध्ये ‘लाईन ४’ हे खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या मार्गावरील मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. तर ‘लाईन ४ए’मध्ये नळस्टॉप, वारजे ते माणिकबाग मेट्रोचे काम करण्यात येणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पुणे मेट्रोच्या फेज -२ कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून या प्रकल्पामध्ये ‘लाईन ४’ हे खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या मार्गावरील मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. तर ‘लाईन ४ए’मध्ये नळस्टॉप, वारजे ते माणिकबाग मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. तसेच कल्याण पुढील बदलापूर आणि कर्जत यादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेलाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. बदलापूर - कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका (३२ किमी) आणि गुजरात येथील देवभूमी द्वारका (ओखा) - कनालस दुहेरीकरण (१४१ किमी) या दोन्ही प्रकल्पांच्या अमलबजावणीचा अंदाजित खर्च २,७८१ कोटी रुपये आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘लाईन २ए’ (वनाज, चांदणी चौक) आणि ‘लाईन-२बी’ (रामवाडी, वाघोली/विठ्ठलवाडी) या कामाला मंजुरी मिळाली आहे. ‘फेज-२’ हा दुसरा मोठा प्रकल्प आहे. एकूण ३१.६३६ किमी लांबीच्या आणि २८ एलिव्हेटेड स्टेशन्स असलेल्या ‘लाईन्स ४’ आणि ‘४अ’मध्ये पूर्व, दक्षिण आणि पश्चिम पुण्यातील आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी प्रकल्पांना जोडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार आहे. त्यासाठी अंदाजे ९,८५७.८५ कोटी खर्च येईल.

प्रवासी वाढीचा अंदाज

‘लाईन ४’ आणि ‘४अ’वरील एकूण दैनिक प्रवासी संख्या २०२८ मध्ये ४.०९ लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. खराडी-खडकवासला कॉरिडॉरवर २०२८ मध्ये ३२.३ दशलक्ष प्रवासी असतील. येत्या काही दशकांमध्ये ‘लाईन ४’ आणि ‘४ अ’वरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज आहे.

मैलाचा दगड

मेट्रोच्या प्रकल्पाची महामेट्रोकडून (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामध्ये सर्व नागरी, विद्युत, यांत्रिक आणि प्रणालींचे काम होईल. यापूर्वी सर्वेक्षण आणि तपशीलवार डिझाइन, सल्लागार सेवा यासारखी कामे सुरू आहेत. नव्या मंजुरीनंतर पुणे मेट्रोचे जाळे हे १०० किमीहून अधिक होणार आहे. हा एक मैलाचा दगड असेल. हे पुण्यासाठी आधुनिक, एकात्मिक आणि शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली आहे. बदलापूर-कर्जत कॉरिडोरने लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला १,३२४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यात गुजरात येथील देवभूमी द्वारका (ओखा ) - कनालस दुहेरीकरण (१४१ किमी) आणि बदलापूर - कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका (३२ किमी) अशा दोन्ही प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा अंदाजित खर्च २,७८१ कोटी रुपये आहे.

मेट्रो-रेल्वे-बस सेवा एकत्रित

मेट्रोच्या लाईन्स पुण्याच्या व्यापक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा (सीएमपी) एक आवश्यक भाग आहेत. खराडी बायपास हा नळ स्टॉप (लाईन २) आणि स्वारगेट (लाईन १) येथे कार्यरत आणि मंजूर कॉरिडॉरशी जोडला जाणार आहे. हडपसर रेल्वे स्टेशनवर एक इंटरचेंजही सुरू करण्यात येणार आहेत. ते लोणी काळभोर आणि सासवड रोडकडे येणाऱ्या कॉरिडॉरशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो, रेल्वे आणि बसची सेवा एकत्रित आणि सुलभपणे जोडली जातील, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

खराडी आयटी पार्कपासून ते खडकवासल्याच्या पर्यटन क्षेत्रापर्यंत आणि हडपसरच्या औद्योगिक केंद्रापासून ते वारजेच्या निवासी समूहापर्यंत ‘लाईन्स ४’ आणि ‘४अ’ विविध क्षेत्रांना जोडण्यात येणार आहेत. सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरून जाणारा हा प्रकल्प पुण्यातील मार्गांवर होणारी सर्वात मोठी वाहतूक कोंडी कमी करेल. त्यातून सुरक्षितता वाढून पर्यावरण आणि दीर्घकाळासाठी होणाऱ्या विकासाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला.

उठ भक्ता झोपलास काय, १ तारखेला लक्ष्मी येणार! मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांची सारवासारव

संयुक्त राष्ट्रांशी संबंधित वन्यजीव कराराने ‘वनतारा’ला कायदेशीर मान्यता

श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणाला पाकचा विरोध; संयुक्त राष्ट्रांना केले आवाहन

शिरसाट यांना ‘अजिंक्यतारा’ बंगला; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत संपली

‘बॉम्बे’चे मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरेंवर पलटवार