उद्धव ठाकरेंसोबत युती का? राज ठाकरेंनी पोस्ट करत सांगितलं नेमकं कारण (Photo-X/@RajThackeray)
मुंबई

उद्धव ठाकरेंसोबत युती का? राज ठाकरेंनी पोस्ट करत सांगितलं नेमकं कारण

ठाकरे बंधूंनी बुधवारी (दि.२४) युतीची अधिकृत घोषणा केली. पण या युतीमागचं कारण काय असू शकेल, याचं उत्तर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर स्पष्ट केलं आहे. ही युती जागांसाठी नाही तर...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईच्या वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२४) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. युती करण्याचं नेमकं कारण त्यांनी पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.

मुंबई शहर गुजरातला जोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याची टीका राज ठाकरे यांनी यापूर्वी केली होती. तसेच, मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत नष्ट होत चालल्याची चिंताही त्यांनी अनेकदा भाषणांतून व्यक्त केली आहे. हीच बाब लक्षात घेत "आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे." असे राज ठाकरे यांनी नमूद केले.

वाचा राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी -

आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.' हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे.

आणि यातूनच हे २ पक्ष एकत्र आले आहेत. बाकी युतीची घोषणा झाली. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील. त्यावर आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत.

युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे. त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील.

मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल.

आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात.

माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा, बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल. सभांच्या वेळेस मराठी बांधव-भगिनींच्या दर्शनाचा योग येईलच. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र !

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येतात तसेच, ठाकरे बंधूंकडून जागावाटपाबद्दल काय निर्णय घेतला जातो, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

"मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आणि फक्त मतांसाठी मत बदलणारे..."; ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

"घेरलं होतं मातोश्रीवरील 'विठ्ठलाला' बडव्यांनी.." उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या घोषणेनंतर आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला

ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंची कडाडून टीका; "ही युती फक्त स्वार्थासाठी आणि...

मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

'ही' शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत...; संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा एल्गार