मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. मंत्रिमंडळ विस्तारात रवींद्र चव्हाण यांना स्थान देण्यात न आल्याने त्यांच्याच नावाची शक्यता अधिक होती. अखेर मंगळवारी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू, माजी मंत्री आणि विद्यमान प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे भाजपचे १२वे प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा वरळीतील एनएससीआय डोम येथे मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली.
“माझी आज या पदावर निवड झाली आहे. खरेतर भाजपने मला हे पद देऊन माझ्यावर उपकार केले. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी २००२ साली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. तिथून काम करत एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता, भाजपचा अध्यक्ष होतो, हे कुठल्याच पक्षात होणार नाही. त्यामुळे हे माझ्यावर उपकार आहेत. भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन,” असे रवींद्र चव्हाण यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.
हाडाचा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाला -गडकरी
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने पक्षाचा तळागाळातील हाडाचा कार्यकर्ता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी असून सामान्य कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, हे केवळ भाजपमध्येच शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते म्हणाले की, “कार्यकर्त्यांच्या त्याग व बलिदानामुळे पक्ष मोठा झाला आहे. त्यांच्या रूपाने आपल्यातील एक कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाल्याचा कार्यकर्त्यांना आनंद आहे.”