मुंबई : ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून त्या तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी हे स्पष्ट केले आहे की त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे ‘मनाचे श्लोक’ वाचलेले नाहीत. वाचले असते तर हे कृत्य केले नसते. ‘मनाचे श्लोक’ मानवी मनाला सदाचारासाठी मार्गदर्शन करतात. हे श्लोक व्यक्तीला आत्मपरीक्षण करण्यास, चुकीच्या इच्छांपासून दूर राहण्यास आणि जीवनात तर्कशुद्ध विचार करण्यास शिकवतात. मनाच्या श्लोकांचा उद्देश मानवी जीवन सर्वार्थाने समृद्ध करणे, पाप रहित करणे हा आहे. अत्याचार करणे, धतिंगणशाही करणे नाही, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला.
सचिन सावंत म्हणाले की, प्रभू श्रीराम यांचा आदर्श हा चारित्र्य, बंधुता, करुणा, प्रेम, संयम, न्यायाचा व सदाचाराचा आहे. धतिंगणशाहीला तिथे स्थान नाही. त्यामुळे ही मंडळी खरेतर रावणाच्या आदर्शावर चालत आहेत. याच करिता अशा धतिंगणांना खरेतर स्वतः ‘मनाचे श्लोक’ वाचण्याची गरज आहे.