मुंबई

शिवसेना शिंदे गट तडजोडीच्या तयारीत; लोकसभा जागावाटपावर भाजप तोडगा काढणार

शिंदे गटाचे नेते तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महायुतीत जागावाटपावरून वाद होण्याचा प्रश्नच येत नाही.

Swapnil S

राजा माने/मुंबई :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अद्याप जागावाटपावर चर्चा झालेली नाही. परंतु, महायुतीत भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीही प्रबळ असल्याने जागावाटपाबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मात्र, भाजप नेते हा प्रश्न महायुती म्हणून सोडविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत भाजप खुलून बोलताना दिसत नाही. मात्र, शिंदे गट अधिकाधिक जागांवर दावा करतानाच तडजोडीचीही भाषा करीत आहे. म्हणजेच एखाद्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार प्रबळ असेल, तर तो भाजप आग्रही असेल, तर कमळाच्या चिन्हावरही लढू शकतो. यासंबंधीचे संकेत खुद्द शिंदे गटाच्या नेत्यांनीच दिले आहेत.

शिंदे गटाचे नेते तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महायुतीत जागावाटपावरून वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. गरज पडल्यास पालघर पॅटर्न राबविण्याची तयारी आहे. असे सांगत त्यांनी तडजोडीचे संकेत दिले. पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपचे असताना ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आणि त्यांनी निवडणूक जिंकली. तसाच प्रकार जर एखादा शिवसेनेचा उमेदवार प्रबळ असेल आणि भाजपला ती जागा हवी असेल, तर शिवसेनेचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर लढू शकतो, असेच स्पष्ट संकेत केसरकर यांनी दिले. यासोबतच शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनीही राजकारणात एका रात्रीत बदल घडू शकतात, असे सांगून राजकीय तडजोडीस शिंदे गट तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील नेते राजकीय तडजोडी घडवून अधिकाधिक जागा जिंकण्याच्या दृष्टीने रणनीती आखू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे राजकीय तडजोडी घडवून आणून जास्तीत जास्त जागा जिंकण्याची भाजपची योजना असली, तरी लोकसभेच्या अनेक जागांवर या अगोदर शिंदे गट आणि अजित पवार गटात थेट लढती झालेल्या आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सहजासहजी तडजोडीची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. कारण मागील निवडणुकीत मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे कट्टर विरोधकांची मने सहज जुळतील, असे नाही. त्याचा फटका महायुतीला बसू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय रायगड, शिरूर, अमरावती, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी दोन गट एकजुटीने काम करतील, अशी स्थिती नाही, असेही बोलले जात आहे.

भाजप-शिंदे गटात तडजोडीची शक्यता

भाजप आणि शिंदे गटात चांगला समन्वय आहे. त्यातच शिंदे गटाचे काही खासदार थेट भाजपमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिथे कुठे तडजोड होणे अशक्य वाटेल, तिथे उमेदवार तोच ठेवून शिंदे गट किंवा भाजपला जागा सोडली जाऊ शकते. त्यामुळे अनेक खासदारांची अपेक्षा तडजोडीच्या लढतीतून पूर्ण होऊ शकते, अशीही चर्चा आहे. मात्र, यासंबंधीचे खरे चित्र जागावाटपानंतरच स्पष्ट होणार आहे.

युती भक्कम : तुमाने

भाजप-शिवसेनेची युती भक्कम आहे. दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकांच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याबाबत होकार, नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. पण मागच्या वेळेला ज्या १८ जागा आम्ही जिंकल्या, त्या सर्व जागा आम्हिाला मिळाव्यात, अशी आमची भूमिका आहे, असे रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?