मुंबई : मध्य रेल्वेच्या हद्दीतील सायन उड्डाणपूल वाहतुकीला खुला झाल्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असताना आता सायन सर्कलजवळील पुलाला दोन अतिरिक्त मार्गिका तयार करून चेंबूर, दादरमार्गे थेट दक्षिण मुंबईत विनाअडथळा प्रवास होणार आहे. यासाठी सुमारे १३० कोटी रुपये खर्च होणार असून डिसेंबर २०२७ पर्यंत या दोन मार्गिका पूर्ण करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने सायन उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे. या पुलाच्या पश्चिमेकडे कुर्त्याच्या दिशेने लाल बहादूर शास्त्री मार्ग, धारावीच्या दिशेने संत रोहिदास मार्ग, तर पूर्वेकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला जोडणारे पोहोच रस्ते बांधण्यात आले आहेत. नवीन उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असला, तरी वाढत्या वाहनसंख्येमुळे सायन सर्कल परिसरात गर्दीच्या वेळेत वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. वाहतूककोंडीवर उतारा म्हणून सायन उड्डाणपुलावर एकूण तीन वाहनमार्गिका आहेत. त्यापैकी दोन मार्गिकांचा वापर ठाणे आणि पूर्व उपनगरांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी, तर एका मार्गिकेचा वापर दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी होतो.
आता पुलाला समांतर दोन अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येत असल्याने वाहनचालकांना एकूण पाच मार्गिका उपलब्ध होतील. त्यापैकी तीन मार्गिका सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी उपलब्ध होऊ शकतील.
या अतिरिक्त मार्गिकांमुळे ठाणे आणि पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना अधिक जागा उपलब्ध होईल. विशेषतः सायन सर्कल परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या विस्तारित पुलाचा उपयोग होणार आहे. मात्र, गर्दीची परिस्थिती आणि वाहतुकीचा प्रवाह लक्षात घेऊन कोणत्या दिशेला किती मार्गिका वापरायच्या याचा निर्णय वाहतूक पोलीस घेणार आहेत. या मार्गिका पूर्ण झाल्यावर चेंबूरपासून सुरू होणारी वाहतूक दक्षिण मुंबईपर्यंत विनाअडथळा होणार आहे.
२५ टक्के काम पूर्ण
अतिरिक्त दोन मार्गिकांच्या पुलाची लांबी १ हजार ३२० मीटर, तर रुंदी ७.५ मीटर आहे. पुलाच्या उभारणीसाठी पायाभरणीचे काम सुरू झाले असून, आतापर्यंत सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सुरुवातीला विचाराधीन होते. मात्र, महापालिकेने कामाला गती देत डिसेंबर २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट!
"सध्याच्या सायन उड्डाणपुलाला समांतर दोन अतिरिक्त मार्गिकांचा पूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना आणखी मार्गिका उपलब्ध होतील आणि वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.