मुंबई

उन्हाळी सत्र परीक्षेचे अर्ज वेळेत सादर करा; मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना

वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव्यविज्ञान विद्याशाखांतील विविध अभ्यासक्रमांच्या सत्र ५ केटी परीक्षांचे प्रवेश अर्ज ३० जानेवारीपर्यंत महाविद्यालयांना विद्यापीठाकडे जमा करता येणार आहेत

Swapnil S

मुंबई : विद्यार्थ्यांच्या केटी परीक्षांचे प्रवेश अर्ज विद्यापीठाकडे दाखल करण्याचा कालावधी मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. यानुसार वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव्यविज्ञान विद्याशाखांतील विविध अभ्यासक्रमांच्या सत्र ५ केटी परीक्षांचे प्रवेश अर्ज ३० जानेवारीपर्यंत महाविद्यालयांना विद्यापीठाकडे जमा करता येणार आहेत. याचबरोबर विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केटीसह नियमित परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्याच्या सूचनाही विद्यापीठाने केल्या आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतूदीनुसार विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल नियोजित वेळेवर जाहीर व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सत्र ६ च्या परीक्षांचे वेळापत्रक ते हॉल तिकिटे ४ महिन्यांपूर्वीच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

सर्व परीक्षांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि नियोजित वेळेत निकाल जाहीर करण्यासाठीही विद्यापीठामार्फत प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षाही वेळेत घेण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. प्रथम व द्वितीय वर्षाच्या केटी परीक्षा या २० फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान घ्यायच्या आहेत तर नियमित परीक्षा ५ मार्च ते १८ मार्च या कालावधीत घ्यायच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अंतर्गत मूल्यांकन निश्चित कालावधीत करा

विज्ञान शाखेतील सत्र ५ आणि सत्र ६ चे प्रात्यक्षिक आणि अंतर्गत गुण सादर करण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल असून सत्र ५ आणि सत्र ६ च्या अप्लाईड कम्पोनेंट विषयांचे अंतर्गत गुण सादर करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. सर्व संबधित महाविद्यालयांनी अंतर्गत मूल्यांकन विहित कालावधीत करण्याच्याही सूचना केल्या आहेत.

गुण पोर्टलवर सादर करा

पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचे गुण पोर्टलवर सादर करण्याची अंतिम तारीख ही ३० मार्च निश्चित करण्यात आली असून विहित मुदतीनंतर अंतर्गत तथा प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण स्वीकारले जाणार नाहीत. विशेष म्हणजे सत्र १ ते ४ परीक्षांचे सर्व अंतर्गत, प्रात्यक्षिक तथा सैद्धांतिक परीक्षांचे गुण १० एप्रिलपर्यंत विद्यापीठ पोर्टलवर सादर करायचे आहे.

...तर दंडात्मक कारवाई करणार

सर्व संबंधित महाविद्यालयांनी विहित मुदतीत प्राथम्याने ही प्रक्रिया पार पाडणे अत्यावश्यक असून, या कामी कसूर झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. सर्व परीक्षा व निकाल वेळेवर जाहीर होण्याकरिता सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

“प्रिय उमर, आम्ही सगळे..."; न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचे तुरूंगात असलेल्या उमर खालिदसाठी पत्र

"सन्माननीय अध्यक्ष..." म्हणत संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांचा 'तो' व्हिडिओ केला शेअर

"मशीन तर तू बांगलादेशी असल्याचं सांगतेय..."; UP पोलिसांच्या 'अविष्कार'चा Video व्हायरल

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी

Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं