मुंबई

धारावीतील २५ हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण; पावसाळ्याच्या आव्हानावर मात; ६० हजारांपेक्षा अधिक झोपड्यांची गणना

दोन निवडणुका आणि लांबलेल्या पावसाळ्याचे आव्हान असूनही धारावीतील २५ हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ६० हजारांहून अधिक झोपड्यांची गणना पूर्ण झाली आहे.

Swapnil S

मुंबई : दोन निवडणुका आणि लांबलेल्या पावसाळ्याचे आव्हान असूनही धारावीतील २५ हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ६० हजारांहून अधिक झोपड्यांची गणना पूर्ण झाली आहे.

धारावी परिसराचे सर्वेक्षण हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा धारावीला आधुनिक, राहण्यायोग्य समुदायात बदलणे तसेच रहिवासी विस्थापित होणार नाही, याची खात्री करणे आहे. अचूक आणि सर्वसमावेशक सर्वेक्षणाशिवाय या प्रकारचा विशालतेचा प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही, असे मानले जाते.

सर्वेक्षणांची सुरुवात जमीन शोधणाऱ्या संघांपासून केली. त्यानंतर झोपड्यांच्या संख्येचे संकलन करण्यात आले. प्रगत लायडार मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण क्षेत्राचा लेआउट चित्रित केला जात आहे. आधारभूत नकाशा प्रमाणित झाल्यानंतर घरोघरी पडताळणीचा टप्पा होतो. प्रत्येक सदनिकेला पूर्वनिर्धारित प्रणालीवर आधारित ओळख कोड देण्यात येतो.

धारावीतील पाच सेक्टर आणि ३४ झोनमध्ये या सर्वेक्षणासाठी दररोज ५० हून अधिक चमू तैनात केले जातात, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याने सांगितले की, दिवसाला सरासरी ३०० ते ४०० झोपड्यांची गणना करण्यात येत असून २०० ते २५० घरांची पडताळणी केली जात आहे. दोन निवडणुका आणि प्रदीर्घ पावसाळ्यासारखी मोठी आव्हाने असूनही यावर्षी मार्चच्या मध्यापासून २५ हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच ६० हजारांहून अधिक झोपड्यांची गणना निश्चित करण्यात आली.

धारावी पुनर्विकास प्रकल्प - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील सूत्रांनुसार, राज्य सरकार धारावीच्या रहिवाशांच्या पात्रता आणि अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अजूनही मोठ्या संख्येने झोपड्यांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे.

सर्वेक्षण ही केवळ नोकरशाहीची औपचारिकता नाही, असे या सूत्रांनी सांगितले. धारावीतील प्रत्येक रहिवाशासाठी उत्तम जीवन जगण्याचे ते प्रवेशद्वार आहे. सर्वेक्षक चमूंना सहकार्य करून, धारावीकर अशा पुनर्विकास प्रक्रियेत त्यांचा समावेश निश्चित करू शकतात जी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन घरांसाठी पात्रतेची हमी देते. सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी धारावीकरांनी एक पाऊल पुढे टाकणे आणि सक्रियपणे सहभाग घेणे आवश्यक आहे.

सर्वेक्षणाला गती देण्यासाठी अतिरिक्त चमू लवकरच

आशियातील सर्वात मोठ्या असलेल्या या झोपडपट्टी सर्वेक्षण उपक्रमाला गती देण्यासाठी अतिरिक्त चमू लवकरच तैनात केले जाणार आहेत. धारावीकरांना खासगी स्वयंपाकघर, शौचालये, अखंड पाणी आणि वीज व आरोग्यदायी, हिरवेगार वातावरण प्रदान करणे हे पुनर्विकास प्रकल्पाचे ध्येय स्पष्ट करण्यात आले आहे. विस्तीर्ण रस्ते, मोकळ्या जागा, आधुनिक आरोग्य सुविधा आणि उत्तम पायाभूत सुविधा हे सर्व या बृह्दचित्राचा भाग असून या साऱ्याची सुरुवात सर्वेक्षणापासून होत असल्याचे नमूद करण्यात आले.

'धारावीकरांची सामूहिक इच्छाशक्ती गरजेची'

राजकीय हस्तक्षेप आणि व्यक्तिगत स्वार्थ यासारख्या अडथळ्यांमुळे पुनर्विकास प्रकल्पाला विलंब होण्याची भीती वारंवार निर्माण होत असताना धारावीकरांची सामूहिक इच्छाशक्ती या आव्हानांवर मात करू शकते, असे सांगितले जाते. धारावीच्या रहिवाशांनी सर्वेक्षण पथकांना सहकार्य केले आहे. मात्र आणखी मोठ्या सहकार्याची आणि अधिक सक्रिय दृष्टिकोन राखण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. ते त्त्वरित पूर्ण होण्याने परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात होईल, असेही या सूत्रांनी सांगितले.

Jalgaon News : जळगावमध्ये ९२,००० ‘लाडक्या बहिणी’ अपात्र? अडकल्या चौकशीच्या फेऱ्यात; अंगणवाडी सेविका घरोघरी करणार सर्वेक्षण

गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

पाकिस्तानवर मेहरबान ट्रम्प! ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’, ‘माजीद ब्रिगेड’चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश

मुसळधारचा इशारा! राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

...तर जामनगर रिफायनरी लक्ष्य करू! पाक लष्करप्रमुख मुनीर यांची नवी धमकी