फेसाळणाऱ्या समुद्रांच्या लाटांसोबत येणारे प्लास्टिक, निर्माल्य आणि दुसरीकडे पर्यटकांकडून होणारा अस्वच्छतेचा मारा यामुळे कचरा कुंडी झालेल्या दादरच्या समुद्रकिनाऱ्याने रविवारी अखेर मोकळा श्वास घेतला. निमित्त होते गांधी जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे. ‘स्वच्छ सागर... सुरक्षित सागर’ हा संकल्प मनाशी बांधून वसुंधरा फाउंडेशन, मिशन ऑनलाइन स्वराज्य आणि ब्रिदिंग रुट्स या तीन संस्थांच्या १००हून अधिक कार्यकर्त्यांनी ही मोहीम राबवली. यावेळी अभिनेता आदित्य देशमुख, डॉ. अभिषेक साटम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबईला समुद्रकिनाऱ्याची नैसर्गिक देणगी लाभली आहे; पण अस्वच्छतेमुळे या किनाऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे आपले समुद्रकिनारे वाचवण्यासाठी वसुंधरा फाउंडेशन, मिशन ऑनलाइन स्वराज्य आणि ब्रिदिंग रुट्स या सामाजिक संस्थांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त दादर पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वसुंधरा फाउंडेशनच्या सुदर्शना जगदाळे, मिशन ऑनलाइन स्वराज्यचे केतन गावंड आणि ब्रिदिंग रुट्सचे जयेश लांबोर व परेश चुरी या संस्थापकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रमदान केले. वरिष्ठ छायाचित्रकार राजेश वराडकर, अभिनेता आदित्य देशमुख, पोतदार कॉलेजमधील एनएसएस विभातील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि तिन्ही संस्थांमधील सभासदांनी एकत्र येऊन किनाऱ्याची साफसफाई केली. यावेळी बराचसा मायक्रो प्लास्टिक, कपडे, काचेच्या वस्तू असा नानाप्रकारचा कचरा गोळा करण्यात आला.