मुंबई

आज थर्टीफर्स्ट...झुमो...नाचो; सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी जोरात

जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत जोशात करण्यासाठी सर्वत्र मोठी धूम आहे. विशेष म्हणजे, यंदा थर्टीफर्स्टला रविवार आल्याने आनंदाला दुप्पट उधाण आले आहे.

Swapnil S

मुंबई : आज थर्टीफर्स्ट...वर्षाचा अखेरचा दिवस...सरत्या वर्षांतील कडू-गोड आठवणींना निरोप देण्याचा दिवस...भारताचा क्रिकेट विश्वचषकातील पराभवाच्या आठवणी रिचवण्याबरोबरच भारताच्या चांद्रयान मोहिमेचे यश पुन्हा एकदा साजरे करण्याचा दिवस...जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत जोशात करण्यासाठी सर्वत्र मोठी धूम आहे. विशेष म्हणजे, यंदा थर्टीफर्स्टला रविवार आल्याने आनंदाला दुप्पट उधाण आले आहे.

सरत्या वर्षात इस्त्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत युद्धाला तोंड फुटले. त्यामुळे सारे जग हादरून गेले. हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू नये, अशी मनोमन साऱ्या जगाने प्रार्थना केली. भारतासाठी सरते वर्ष व्यामिश्र स्वरुपाचे ठरले. चांद्रयान मोहिमेची यशस्विता भारताला जगात उच्च स्थानावर घेऊन गेली. त्याचपाठोपाठ भारताने आदित्य एल-१ ही सौर मोहिमही हाती घेतली आहे. सिलक्यारा येथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांना जवळपास पंधरा दिवसांनी सुरक्षीत बाहेर काढून अभिमानास्पद कामगिरी बचाव पथकाने केली. मात्र, क्रिकेट विश्वचषकातील पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला. या साऱ्या कडू-गोड आठवणी रिचवण्याचा आजचा दिवस.

थर्टीफर्स्टला मटण, चिकन, अंडी, माशांसोबतच कोणते ड्रिंक्स घ्यायचे, याची खास तयारी सुरू आहे. कोण काय घेणार? किती घेणार? चकना कोण आणणार, याचे बेत ऑफीस, घराघरांत, मित्रमंडळींत रंगत आहेत. थर्टीफर्स्टची रात्र गाजवण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरची रात्र गाजवण्यासाठी वेगवेगळी हॉटेल्स, पब्ज, बार, रिसॉर्ट‌्स बुक झाले आहेत. हजारो पर्यटक अनेक निवांत ठिकाणी रवाना झाले आहेत. सोबत आपला आवडता ‘ब्रँड’ही निवडला आहे, तर कोकणातही अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट, होम स्टे हाऊसफुल्ल झाली आहेत. अनेकांनी कुटुंबासह मुंबई सोडून अनेक निसर्गरम्य जागांवर तंबू ठोकले आहेत.

थर्टीफर्स्टला विशेष पार्ट्या होणार आहेत. त्यामुळे खाण्या-पिण्याची चंगळ असेल. रविवार असल्याने दारूसोबतच मच्छी-मटण-अंड्याचा फडशा पडणार आहे. त्यामुळे हॉटेल व रिसॉर्ट मालकांनी ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेऊन अधिक पदार्थांची ऑर्डर दिली आहे.

मुंबई व ठाणे जिल्ह्यात रिसॉर्ट व हॉटेलवर नववर्ष साजरे करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. या काळात वाद होत असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयातर्फे तसेच पालघर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, ठिकठिकाणचे रिसॉर्ट‌्स, महामार्गावरील हॉटेल्स या ठिकाणी पोलिसांनी टेहळणी सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे, वाहने चालविणे, महिलांची छेडछाड आदी प्रकार रोखायला पोलिसांनी कंबर कसली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मुंबईच्या रस्त्यावर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो लोक उतरतात. तसेच काही चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना ४०० ब्रेथ ॲॅनालायझर मशीन दिल्या आहेत. तसेच शहराच्या महत्त्वाच्या भागात वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. गेल्यावर्षी थर्टीफर्स्टला मुंबई वाहतूक पोलिसांनी ८४८९ चालकांवर कारवाई केली होती.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल