मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी माहीमपाठोपाठ आता वरळीतही चवदार मासळीवर ताव मारता येणार आहे. वरळीत ‘सीफूड प्लाझा’ सुरू करण्यात आला असून इलेक्ट्रिक फूड ट्रक, मासळी सुकविण्यासाठी सोलार ड्रायरचे वितरण मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. महिला बचत गटांना रोजगार मिळावा यासाठी ‘सीफूड प्लाझा’ संकल्पना राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
कोळीवाड्यातील मासळी सुकवताना होणारा त्रास कमी करणे, पर्यटनाला चालना देण्यासाठी सोलार ड्रायर देण्यात आले आहेत. कोळीवाड्यातील मासळी मॉलला जायला हवी, तर उरलेल्या भुकटीचा खत तयार करण्यासाठी उपयोग करणे, कोळीवाड्यात स्वच्छता राखणे, कोळीवाड्यातील मूळ रूप टिकून ठेवणे, बंदराला भेट देण्यासाठी पर्यटकांमध्ये वाढ करणे हा मुख्य उद्देश असून बंदर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
महिला बचत गटांना ‘सीफूड प्लाझा’मध्ये आधार देण्यासाठी या विजेवर चालणाऱ्या फूड ट्रकचे प्रातिनिधिक वितरण करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून येत्या दिवसात माहीम आणि वरळी कोळीवाडा येथील सीफूड प्लाझासाठी विजेवर चालणाऱ्या आणखी फूड ट्रकचे वितरण करण्यात येणार आहे. ओव्हन, इलेक्ट्रॉनिक शेगडी, जेवण गरम ठेवण्यासाठी भांडी, डीप फ्रायर अशा उपकरणांचा या वाहनात समावेश आहे.
दिवसा सोलार, रात्री बॅटरी बॅकअप!
बचतगटाच्या मासळी सुकवण्याची गरज पाहता, सोलार ड्रायरद्वारे ५०० किलो मासळी सुकवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फूड कोर्टला दिवसा सोलार, तर रात्री बॅटरी बॅकअप असणार आहे. यावेळी पालिका उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे, स्थानिक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.