राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच राजकीय वर्तुळात एक वेगळीच चुणूक दिसून येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांमधील नातेसंबंध पुन्हा जुळत असल्याची चिन्हे आता उघडपणे दिसू लागली आहेत. यंदाच्या दिवाळीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
मनसेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील शिवाजी पार्कवर दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पण, यंदाचा दीपोत्सव 'विशेष' ठरणार आहे. कारण या सोहळ्याचं उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मनसेच्या दीपोत्सवाच्या आमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव पाहून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
ठाकरेंची सातवी भेट - आता दीपोत्सवातून नवा संदेश
गेल्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढताना दिसत आहे. मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांतच राज आणि उद्धव ठाकरेंची तब्बल सात वेळा भेट झाली आहे. कधी ‘मातोश्री’वर, तर कधी ‘शिवतीर्थ’वर झालेल्या या भेटींमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. आता या नात्याचा पुढचा टप्पा म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने होणारा 'एकत्र दीपोत्सव' ठरतो आहे.
निवडणूक आयोगातही एकत्र मोर्चेबांधणी
दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षांनी आज राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर केले. मुंबईत झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकत्र दिसले. ही ठाकरे बंधूंची सातवी सार्वजनिक भेट ठरली. या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत आयोगाने पारदर्शक आणि निष्पक्ष भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
ठाकरे बंधूंच्या अशा भेटीमुळे आगामी निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र असण्याची धूसर कल्पना आता सत्यात उतरताना दिसत आहे. कधी औपचारिक तर कधी अनौपचारिक होत असलेल्या भेटीचे पुढे युतीत रूपांतर होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.