गिरीश चित्रे/मुंबई
मुंबईसह राज्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सागरी सेतू मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. मोनो, मेट्रो रेलचे जाळे विस्तारले जात असून उत्तन ते विरार सी लिंक प्रकल्प राबवण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र हा प्रकल्प सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, उत्तन ते विरार हा सहा पदरी प्रकल्प असून या मार्गासाठी अंदाजे ५६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबईसह राज्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सोडवण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत असून काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. वांद्रे ते वर्सोवा आणि आता उत्तन ते विरार पर्यंत सी लिंक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुमारे ४८ किमी लांबीचा हा सागरी सेतू मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला आठ मार्गिकांचा विचार केला होता, परंतु आता सहा मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ५६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी २८ टक्के निधी एमएमआरडीए तर उर्वरित ७२ टक्के निधी ‘जायका’ किंवा इतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात केला जाणार आहे.
उत्तन-विरार सागरी सेतू वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडशी जोडला जाणार असून उत्तरेकडे तो दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात या सेतूचा विस्तार पालघरपर्यंत होणार असून तेथील वाढवण बंदराशीही त्याची जोडणी केली जाणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे ठेवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने याला मान्यता दिल्यानंतर कामाला सुरुवात होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पालघर दरम्यानचा प्रवास वेगवान व सुलभ होईल. तसेच परिसरातील वाहतुकीवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास नगरविकास विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.
उत्तन-विरार सी लिंकची वैशिष्ट्ये
एकूण लांबी - ४८ किमी
मुख्य सागरी मार्ग - २४.३५ किमी
कनेक्टर्स - ३०.७७ किमी
उत्तन कनेक्टर (९.३२ किमी) बृहन्मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोडशी जोड
वसई कनेक्टर (२.५ किमी) - पूर्णपणे उन्नत
विरार कनेक्टर (१८.९५ किमी) - वडोदरा- मुंबई एक्स्प्रेस-वेला जोडला जाईल.