वसई : वसई पूर्व–पश्चिमेला जोडणारा जुना पूल हटवून नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र यामध्ये पूर्वेकडील उतरण रस्ता (इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळील उतार) पूर्णपणे गायब झाल्याने औद्योगिक वसाहतीतील कारखानदार, कामगार आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. नव्या पुलाच्या डिझाईनबाबत महानगरपालिका अनभिज्ञ असल्याचेही समोर येत असून शिवसेनेचे जिल्हा सचिव राजाराम बाबर यांनी रेल कॉर्पोरेशनचे चेअरमन विलास सोपान वाडेकर यांना पत्र देऊन हरकती नोंदवल्या आहेत.
जुना पूल २०१७ पासून बांधण्याची मागणी बाबर यांनी केली होती. ती मान्य झाली असली तरी पूर्वेकडील उतरण रस्ता न ठेवल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होणार आहे. इंडियन ऑईल पंप, औद्योगिक वसाहत, निवासी परिसर, नवघर पूर्व स्मशानभूमी येथे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा होता. भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाढणारी वाहतूक पाहता हा मार्ग पुन्हा ठेवणे गरजेचे असल्याची मागणी बाबर यांनी पत्रात केली आहे. पूर्वीचा पूल सात मीटर रुंद असताना आता ११ मीटर रुंदीचा पूल उभारत असल्याने जवळच सुरू असलेल्या नरवीर चिमाजी आप्पा स्मारकाच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशीही नोंद त्यांनी केली.
बाबर यांनी हेच पत्र पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित आणि पालिका आयुक्त संजय हेरवाडे यांनाही दिले असून पालिकेने यामध्ये हस्तक्षेप करून पूर्वेकडील रस्ता कायम ठेवण्याची मागणी केली आहे. पूर्वेकडील पेट्रोल पंपाजवळच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असल्याने त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठा फेरा मारावा लागणार आहे.
“वसई पूर्वेला येणारा रस्ता बंद केल्याने नागरिकांना लांब फेरा मारून यावे लागणार आहे. भविष्यात लोकसंख्या वाढणार असल्याने वाहतूक कोंडी वाढेल. औद्योगिक वसाहतीतील वाहनांना वळसा घालावा लागणे म्हणजे अतिरिक्त वेळ आणि खर्च. रेल कॉर्पोरेशन व महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन पूर्वेकडील रस्ता ठेवावा.” - राजाराम बाबर, जिल्हा सचिव, शिवसेना
“पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीत ७० ते ७५ हजार कामगार कार्यरत आहेत. अनेक जण उत्तर वसईतून दुचाकी किंवा चारचाकीने येतात. आता त्यांना मोठा वळसा घालून यावे लागेल. रहिवासी वसाहतीतील नागरिकांनाही पश्चिमेला जाताना फेरा मारावा लागणार आहे. पूर्वीचा रस्ता जसाच्या तसा ठेवावा, अन्यथा मोठे आंदोलन करू.” - फ्रान्सिस फर्नांडिस, उपाध्यक्ष, वसई इंडस्ट्रियल असोसिएशन