मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या कारवाईच्या निर्णयामुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांमध्ये घबराट पसरली असून अनेक ग्राहक शाखेत धाव घेत असल्याचे दिसून आले. शुक्रवारी मुंबईतील बँकेच्या बाहेर गोंधळ उडाला. निर्बंधांमुळे ठेवीदारांना कोणतीही रक्कम त्यांच्या बचत, चालू किंवा अन्य प्रकारच्या खात्यांतून काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेवर निर्बंध लावल्यामुळे बँकेच्या व्यावसायिक व्यवहारांवर १३ फेब्रुवारीपासून मर्यादा आल्या आहेत. हे निर्बंध गुरुवारी बँकेच्या व्यवसाय संपल्यानंतर लागू झाले असून सहा महिन्यांसाठी लागू राहतील. मात्र, मध्यवर्ती बँक भविष्यात त्याचा आढावा घेऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेच्या सध्याच्या तरलता स्थितीमुळे कोणतेही पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गुरुवारी जारी केलेल्या रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार, मुंबईस्थित या बँकेला कर्ज देण्यास तसेच ठेवी स्वीकारण्यास आणि ग्राहकांना पैसे काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ही कारवाई बँकेच्या आर्थिक स्थितीबाबतच्या निरीक्षणात्मक चिंता लक्षात घेऊन करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ग्राहकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत असून अनेकांनी बँकेच्या शाखेसमोर उपस्थिती दर्शवून आपले मत व्यक्त केले.
बँकेच्या अचानक आलेल्या निर्बंधांमुळे अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यापैकी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ग्राहकया परिस्थितीमुळे अडचणीत आले आहेत.
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत ५ लाख रुपयेपर्यंतच्या ठेवीसाठी विमा मिळणार आहे. यामुळे या कठीण काळात ग्राहकांचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे.
आरबीआयच्या काही सवलती
ग्राहकांना पैसे काढण्यावर बंदी असली तरी रिझर्व्ह बँकेने काही नियम शिथिल केले आहेत. बँकेला ठेवींच्या आधारे काही कर्ज परतफेडी परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँक कर्मचारी पगार, भाडे, आणि वीज बिलांसारख्या आवश्यक खर्चासाठी पैसे वापरू शकते. १३ फेब्रुवारीपासून बँक कोणतेही नवीन कर्ज किंवा गुंतवणूक करू शकणार नाही. नवीन ठेवी स्वीकारण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी सहकारी बँकेला घेणे आवश्यक असेल.
आम्ही कालच पैसे जमा केले होते. आम्हाला काहीच सांगितले नाही. असे काही घडणार आहे याबाबत बँकेने आम्हाला आधीच सांगायला हवे होते. बँक आता म्हणते की, तीन महिन्यांत पैसे मिळतील. आम्हाला आमचे ईएमआय भरायचे आहेत. रोजचा संसार आम्ही कसा सांभाळायचा?
- सीमा वाघमारे, बँक ग्राहक