मुंबई  
मुंबई

Mumbai : 'बॉम्बे'ची 'मुंबई' कधी झाली? काय आहे या नावामागची गोष्ट? जाणून घ्या

पोर्तुगीजांनी दिलेल्या 'बॉम्बे' या नावावरून राज्य शासनाने 'मुंबई' हे नाव अधिकृतपणे स्वीकारले आहे. मात्र, आजही अनेकांच्या तोंडी 'मुंबई' ऐवजी 'बॉम्बे' हा उच्चार ऐकायला मिळतो. पण, या मागचा इतिहास अनेकांना माहीती नाही.

किशोरी घायवट-उबाळे

'बॉम्बे'चे नामकरण कित्येक वर्षांआधी मुंबई होऊनही राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण मुंबईचा उल्लेख आजही 'बॉम्बे' असाच करतात. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी सोमवारी (दि.२४) मुंबईच्या नावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे 'मुंबई'च्या उच्चाराचा विषय प्रकर्षाने समोर आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यासंबंधी पोस्ट करत जितेंद्र सिंग यांची कानउघाडणी केली. असं सगळं असताना, आता मुंबईच्या नावाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोर्तुगीजांनी दिलेल्या 'बॉम्बे' या नावावरून राज्य शासनाने 'मुंबई' हे नाव अधिकृतपणे स्वीकारले आहे. मात्र, आजही अनेकांच्या तोंडी 'मुंबई' ऐवजी 'बॉम्बे' हा उच्चार ऐकायला मिळतो. पण, या मागचा इतिहास अनेकांना माहीती नाही. या वादाच्या निमित्ताने जाणून घेऊया 'मुंबई' या नावामागचे कारण.

बॉम्बे हे नाव कोणी ठेवलं?

मुंबईचं जुनं नाव 'बॉम्बे' असं होतं. ब्रिटीशांच्या राजवटीत हे नाव अतिशय प्रचलित होतं. १६व्या शतकात जेव्हा पोर्तुगीजांनी येथे सत्ता मिळवली, तेव्हा त्यांनी हे नाव वापरायला सुरुवात केली. नंतर ब्रिटिशांनीही तेच नाव पुढे चालू ठेवले. तब्बल ३०० वर्षांहून जास्त काळ जगभरात हे शहर 'बॉम्बे' म्हणूनच ओळखलं जात होतं. त्या काळात हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र आणि बंदर म्हणून विकसित झालं.

‘बॉम्बे’ का म्हटलं जात होतं?

पोर्तुगीज भाषेतील 'बॉम बाहिया' या शब्दातून 'बॉम्बे' हे नाव आल्याचं मानलं जातं. 'बॉम बाहिया' म्हणजे उपसागर; शहराच्या नैसर्गिक, सुरक्षित बंदराचा उल्लेख. हळूहळू या नावाचं रूपांतर 'बॉम्बे'मध्ये झालं. नंतर १७व्या शतकात ब्रिटिशांनी पोर्तुगीजांकडून शहराचा ताबा घेतला तेव्हा त्यांनीही हेच नाव कायम ठेवलं.

मुंबई अधिकृत नाव कसं मिळालं?

१९९५ मध्ये महाराष्ट्र सरकारने बॉम्बेचे अधिकृत नाव बदलून ‘मुंबई’ केले. हे नाव शहराच्या स्थानिक इतिहासाशी आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेले आहे. 'मुंबई' हा शब्द कोळी समुदायाची आराध्य देवता 'मुंबा देवी' या देवीवरून ठेवण्यात आले. मुंबा म्हणजे देवीचं नाव आणि आई म्हणजे मातृस्वरूप; म्हणून मुंबईचा अर्थ मुंबा देवीची जमीन किंवा देवीचे शहर असा होतो.

नाव बदलण्यामागची कारणे

  • स्थानिक ओळख पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न :
    ब्रिटिशांनी दिलेलं बॉम्बे हे नाव वसाहतवादी काळाची आठवण करून देत होतं. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर स्थानिक वारसा, भाषा आणि इतिहासाला प्राधान्य देण्याची गरज जाणवली.

  • मराठी आणि कोळी संस्कृतीचा सन्मान :
    मुंबईचा खरा उगम कोळी समुदायाच्या वसाहतीतून झाला. त्यामुळे शहराचं नाव या समुदायाच्या देवीशी जोडल्याने शहराच्या मूळ संस्कृतीचा सन्मान केला गेला.

  • स्थानिक भाषेवर भर :
    महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असल्यामुळे, इंग्रजीकरण झालेल्या 'बॉम्बे'ऐवजी स्थानिक भाषेशी सुसंगत 'मुंबई' हे नाव स्वीकारणे योग्य वाटले.

  • राजकीय आणि सांस्कृतिक चळवळींचा प्रभाव :
    १९९० च्या दशकात स्थानिकत्व आणि मराठी अस्मिता या विषयांवर अनेक सामाजिक-राजकीय आंदोलनं झाली. त्यातून शहरासाठी आपली मूळ ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा आग्रह वाढला, आणि त्याचा परिपाक म्हणजे 'मुंबई' हे नाव अधिकृतपणे स्वीकारले गेले.

बाळासाहेब ठाकरे मुंबईसाठी आग्रही

अनेक वर्षे शिवसेनेने नाव बदलासाठी जोरदार मोहीम चालवली. त्यांचा दावा होता की, ‘बॉम्बे’ हे वसाहतवादी आणि इंग्रजीकृत नाव आहे, त्यामुळे मूळ नाव ‘मुंबई’ वापरणे आवश्यक आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर गेटवे ऑफ इंडियावर ‘मुंबई’ असा बोर्ड लावून प्रत्यक्ष पाऊलही उचलले होते. मात्र, तत्कालीन केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय ओळख कमी होईल या भीतीने बराच काळ नाव बदलाला मंजुरी दिली नाही. पण, स्थानिकांसाठी हा बदल फारसा नव्हता, कारण मराठी आणि गुजराती भाषिक लोक शहराला आधीपासूनच ‘मुंबई’ म्हणत होते.

मुंबईच्या धर्तीवर देशातील इतर शहरांनीही नावे बदलण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये मद्रासचे ‘चेन्नई’ असे नामकरण करण्यात आले. तमिळ भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा हेतू होता.

या वादातून मात्र एक गोष्ट स्पष्ट होते, मुंबईच्या नावात केवळ बदल नाही, तर या शहराच्या ओळखीचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा मोठा प्रवास दडलेला आहे. सध्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मुंबई–बॉम्बे’ वाद पुन्हा समोर आला आहे. आता सरकार कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

केंद्रीय मंत्र्यांचा 'बॉम्बे' उच्चार; राज ठाकरेंकडून कानउघडणी, म्हणाले, 'मुंबई' नाव खटकतं कारण...

डोंबिवली : भीक मागणाऱ्या तरुणीला दिला आसरा; पाच वर्षांनी केला तिचा खून, खाडीत सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, धक्कादायक Video समोर

"माझा मुलगा असा वागला असता तर..."; पंकजा मुंडेंनी घेतली गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट