मुंबई

१३ वर्षांपासून काम अपूर्णच; सहाव्या मार्गिकेलाही फटका

प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवी, सहावी मार्गिका गेल्या १३ वर्षांपासून रखडली आहे. अतिक्रमण, जागेची कमतरता यामुळे या पट्ट्यात कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. याचा परिणाम प्रकल्पाच्या गतीवर होत असून पाचव्या मार्गिकेतील दादर ते सांताक्रुझ हा पट्टादेखील अद्याप अपूर्ण आहे.

मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका उभारून मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय व पश्चिम रेल्वेने घेतला. २००८-०९ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचव्या, सहाव्या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली. या मार्गिकेसाठी ९१८ कोटी ५३ लाख रुपये तरतूददेखील करण्यात आली; परंतु मागील १३ वर्षांत मुंबई सेंट्रल ते दादपर्यंतही कामे पूर्ण करण्यात आली आहेत; मात्र दादर ते सांताक्रूझपर्यंत पाचवी मार्गिका अद्याप तयार झालेली नाही. वांद्रे, खार, सांताक्रूझ येथे या मार्गिकेच्या जागेवर अतिक्रमणे आहेत. वांद्रे येथे दफनभूमी असून ती स्थलांतरित करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मार्गिकेचे काम रखडले आहे.

दरम्यान, प्रकल्प मंजूर झाला त्यावेळी ४३० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता याच प्रकल्पाची किंमत ९३० कोटी रुपये झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवा, सहावा मार्गही एमयूटीपीचाच भाग असून ही मार्गिका पश्चिम रेल्वेकडून निर्माण केली जात आहे. राज्य शासनाकडून गेल्या तीन वर्षांत एमयूटीपी प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने त्याचा फटका या मार्गिकेलाही बसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सहावी मार्गिकेसाठी ९९ घरे रिकामी

सहाव्या मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी विलेपार्ले येथील रेल्वे वसाहतींचीही जागा लागणार आहे. विलेपार्ले येथे नऊ इमारतींसह एकूण १०२ घरे असून त्यातील ९९ घरे रिकामी करण्यात आली आहेत. नऊ इमारतींपैकी सात इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही कामे पूर्ण होताच रुळांसह अन्य कामे हाती घेण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक