राष्ट्रीय

घरविक्रीत ३३ टक्के वाढ; देशभरात ४.११ लाख घरांची विक्री

अहमदाबाद शहरात तर घरांच्या विक्रीत तब्बल ५१ टक्के वाढ झाली असून एकूण ४१३२७ घरे विकली गेली आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : नुकत्याच सरलेल्या २०२३ साली देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये निवासी जागांच्या विक्रीत वर्षभरात तब्बल ३३ टक्के वाढ झाली असून एकूण ४.११ लाख घरांची विक्री झाली आहे. तसेच या वर्षी घरांचा पुरवठा देखील ५.१७ लाख या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. या वर्षी घरांच्या पुरवठ्यात देखील २० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती प्रॉपटायगर या रियल इस्टेट सल्लागार संस्थेच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे.

हाऊसिंग डॉटकॉम या संकेतस्थळाची मालकी असलेल्या रिया इंडिया संस्थेचा एक घटक म्हणजेच प्रॉप टायगर ही हाऊसिंग ब्रोकरेज संस्था होय. या संस्थेने गुरुवारी आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार २०२३ साली देशातील प्रमुख आठ शहरात घरांच्या विक्रीत ३३ टक्के वाढ होउन एकूण ४१०७९१ घरे विकली गेली आहेत. आधीच्या वर्षी या आठ शहरांत मिळून एकूण ३०८९४२ घरांची विक्री झाली होती. २०१३ नंतर प्रथमच २०२३ साली घरांच्या विक्रीत इतकी वाढ झाली आहे. २०१३ साली देशभरात ४३१५१० घरांची विक्री झाली होती. तसेच घरांचा पुरवठा देखील या वर्षी २० टक्क्यांनी वाढून ५१७०७१ झाला आहे. २०२२ साली देशभरात एकूण ४३१५१० घरांचा पुरवठा झाला होता. सुरुवातीस वाढते व्याजदर, वाढता उत्पादन खर्च आणि जागांच्या भडकणाऱ्या किमतींमुळे घरविक्रीत अडचणी आल्या होत्या. मात्र उद्योगाने चिकाटी दाखवल्यामुळे नंतर विक्रीत वाढ होत गेली. महामारीनंतर मागणी हळूहळू वाढू लागली. यामुळेच प्रॉपर्टी बाजारात तेजी आली अशी प्रतिक्रिया रिया इंडियाचे सीएफओ विकास वाधवान यांनी व्यक्त केली आहे. तसेच आरबीआयने व्याजदर न वाढवता स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा प्रॉपर्टी उद्योगाला उभारी मिळण्यास खूप फायदा झाला आहे.

अहमदाबाद शहरात तर घरांच्या विक्रीत तब्बल ५१ टक्के वाढ झाली असून एकूण ४१३२७ घरे विकली गेली आहेत. आधीच्या वर्षी येथे २७३१४ घरे विकली गेली होती. तसेच नव्या घरबांधणीत देखील ७१ टक्के वाढ झाली असून ३२६६३ च्या तुलनेत २०२३ साली ५५८७७ नवे घरे बांधली गेली आहेत. त्याचप्रमाणे बंगळुरू शहरात घरांची विक्री ४४ टक्क्यांनी वाढली असून एकूण ४४००२ घरे विकली गेली आहेत. आधीच्या वर्षी या शहरात ३०४६७ घरांची विक्री झाली होती. तसेच गेल्या वर्षी या शहरात एकूण ४७९६५ नवी घरे बांधण्यात आली. गेल्या वर्षी ४२२१५ नवी घरे बांधण्यात आली होती. २०२३ साली नव्या घरांच्या पुरवठ्यात १४ टक्के वाढ झाली. त्याचप्रमाणे चेन्नई शहरात ७४ टक्के वाढीने एकूण १६१५३ नवी घरे बांधली गेली. आधीच्या वर्षी ९३१० नवी घरे बांधली गेली होती. तसेच २०२३ साल चेन्नईत ५ टक्के वाढीने १४८३६ घरांची विक्री झाली. आधीच्या वर्षी १४०९७ घरांची विक्री झाली होती. उत्तरेकडे दिल्ली शहरात २०२३ साली ११ टक्के वाढीने २१३६४ घरांची विक्री झाली. आधीच्या वर्षी १९२४० घरांची विक्री झाली होती. तसेच नवी दिल्लीत नव्या घरांचा पुरवठा देखील ३४ टक्के वाढून २०५७२ झाला आहे. जो आधी १५३८२ होता. तसेच हैदराबाद शहरात ४९ टक्के वाढीने एकूण ५२५७१ घरांची विक्री झाली. आधीच्या वर्षी ३५३७२ घरांची विक्री झाली होती. मात्र नव्या घरांच्या बांधणीत येथे ७ टक्के घट झाली असून ८२८०१ घरांच्या जागी ७६८१९ नवी घरे बांधली गेली आहेत. तसेच कोलकाता शहरात घरांची विक्री १६ टक्के वाढीने १२५१५ झाली आहे. आधीच्या वर्षी ही संख्या १०७४६ होती. तसेच नव्या घरांचा पुरवठा ८७ टक्के वाढून १५३०३ झाला आहे. आधीच्या वर्षी हा पुरवठा ८१९६ होता.

२०२३ सालची आकडेवारी आणि त्या आधीच्या वर्षाची आकडेवारी यांची तुलना केल्यास मुंबईत घरांची विक्री २९ टक्के वाढून १४१४८० झाली आहे. आधीच्या वर्षी ही विक्री १०९६७७ होती. तसेच मुंबईत नव्या घरांच्या पुरवठ्यात देखील ८ टक्के वाढ झाली असून एकूण १७८६८४ घरांचा पुरवठा झाला आहे. आधीच्या वर्षी हा पुरवठा १६५६३४ होता. पुणे शहरात देखील घरांच्या विक्रीत २०२३ साली ३३ टक्के वाढ झाली आणि एकूण ८२६९६ घरे विकली गेली. गेल्या वर्षी ६२०२९ घरे विकली गेली होती. तसेच पुणे शहरात देखील ४० टक्के वाढ होऊन एकूण १०५६९८ घरांचा पुरवठा झाला. आधीच्या वर्षी केवळ ७५३०९ घरांचा पुरवठा झाला होता.

"आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार...." ; संजय राऊतांना धमकी, घराबाहेरील सुरक्षेत वाढ, बॉम्बशोधक पथक दाखल

कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधीच भाजपच्या महिला उमेदवारांचा विजय; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भाजपचं खातं...

धनंजय मुंडेंना क्लीन चिट; आरोप तथ्यहीन ठरवत करुणा शर्मांची फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली, नेमके प्रकरण काय?

Pune Traffic Update : नववर्षाच्या जल्लोषासाठी फिरायला जाताय? मग त्याआधी पुण्यातील वाहतुकीचे 'हे' बदल वाचाच

"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स