अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा केला? RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी 
राष्ट्रीय

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा केला? RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी

तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागविण्यात आला, असा प्रश्न सुरतमधील माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते अमित तिवारी यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकार आणि कर विभागाकडे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

CJP च्या कायदेशीर अस्तित्वावर प्रश्न

अमित तिवारी यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या निवेदनात, सीजेपी ही जनप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९अ अंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्ष नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. अशा परिस्थितीत ही संघटना राजकीय पक्ष म्हणून कार्य करू शकते का आणि निधी स्वीकारू किंवा गोळा करू शकते का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सीजेपीच्या आंदोलनकर्त्यांसाठी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर मदत निधीचाही त्यांनी उल्लेख केला असून, हा निधी नोंदणीकृत नसलेल्या संघटनेला स्वीकारता येतो का, याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

परदेशातील शिक्षणाच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी

तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

भगवानराव दिपके हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. सेवाकाळात त्यांचे मासिक वेतन सुमारे ६० ते ६५ हजार रुपये असल्याचा दावा करत, अशा परिस्थितीत अभिजीत दिपके यांच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागविण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठातून (Boston University) पब्लिक रिलेशन्स विषयात एमएस पदवी घेतली आहे.

मालमत्तेचीही चौकशी करा

दिपके कुटुंबाकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता (Disproportionate Assets) आहे का, याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

GST बाबतही मागितले स्पष्टीकरण

अमित तिवारी यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाकडे (CBIC) देखील निवेदन दिले आहे.

कपिल सिब्बल यांनी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर मदत निधीवर वस्तू आणि सेवा कर (GST) लागू होतो का, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारलाही या प्रकरणातील आर्थिक बाबींची चौकशी करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

अधिकृत चौकशी अद्याप सुरू नाही

माहितीनुसार, अभिजीत दिपके हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांचे वडील सरकारी उपक्रमात अभियंता होते, सध्या ते सेवेतून निवृत्त झाले आहेत तर त्यांची आई गृहिणी आहे.

काही माध्यमांतील माहितीनुसार, परदेशातील शिक्षणासाठी कुटुंबाने शैक्षणिक कर्ज घेतल्याचेही सांगितले जाते. मात्र शिक्षणाचा खर्च नेमका शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, वैयक्तिक बचत किंवा इतर कोणत्या माध्यमातून भागविण्यात आला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निष्कर्ष उपलब्ध नाही.

तसेच, अमित तिवारी यांनी केलेल्या तक्रारी या चौकशीची मागणी असून, या प्रकरणात कोणत्याही शासकीय यंत्रणेने अद्याप चौकशी सुरू केल्याची किंवा कोणताही निष्कर्ष जाहीर केल्याची माहिती समोर आलेली नाही.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video