तेलंगणा : सध्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ होत असतानाच, तेलंगणा सरकारने अदानी फाऊंडेशनने देऊ केलेली १०० कोटींची देणगी नाकारली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. गौतम अदानी यांनी तेलंगणा सरकारला १०० कोटी रुपयांची देणगी दिल्याचे भाजपने अलीकडेच म्हटले होते. यावर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, “यंग इंडिया स्कील युनिव्हर्सिटीसाठी अनेक कंपन्यांनी निधी दिला होता. यामध्ये अदानी समूहानेही १०० कोटी रुपयांची देणगी दिली होती. मात्र, अदानी यांनी दिलेले १०० कोटी रुपये स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच अदानी समूहाचे १०० कोटी रुपये परत केले जातील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.”
तेलंगणाचे विशेष मुख्य सचिव आणि औद्योगिक प्रोत्साहन, उद्योग आणि वाणिज्य विभागाचे आयुक्त जयेश रंजन यांनी डॉ. प्रीती अदानी यांना यासंबंधी पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “तुमच्या फाऊंडेशनकडून यंग इंडिया स्कील युनिव्हर्सिटीला १०० कोटी रुपये देऊ केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. मात्र विद्यापीठाला कलम ८०जी अंतर्गत आयटी सूट मिळालेली नसल्यामुळे आम्ही आतापर्यंत कोणत्याही देणगीदारांना निधीचे प्रत्यक्ष हस्तांतरण करण्यास सांगितले नाही. जरी या सवलतीसंबंधीचा आदेश नुकताच आला असला, तरी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सद्य परिस्थिती आणि भविष्यात उद्भवू शकणारे वाद लक्षात घेता निधी हस्तांतरित करू नये, असे निर्देश दिले आहेत.”