Photo : X (@DrSJaishankar)
राष्ट्रीय

आमच्या भूमीचा भारताविरोधात वापर करू देणार नाही! अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांची हमी

अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळ कोणालाही देणार नाही. तसेच आमच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी करू देणार नाही, अशी हमी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताला दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळ कोणालाही देणार नाही. तसेच आमच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी करू देणार नाही, अशी हमी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताला दिली.

ते म्हणाले की, अफगाण जनता आपल्या भूमीवर परदेशी सैन्य कदापि स्वीकारणार नाही. कोणाला अफगाणिस्तानसोबत संबंध ठेवायचे असल्यास त्यांनी राजनैतिक पद्धतीने यावे, लष्कराच्या गणवेशात नाही, असे त्यांनी सांगितले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाण परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारताने शुक्रवारी काबूलमधील आपल्या ‘तांत्रिक मिशन’ला दूतावासाचा दर्जा दिल्याची घोषणा केली आणि अफगाणिस्तानातील विकासकामे पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या सुरक्षाविषयक चिंतेबाबत संवेदनशीलता दाखवल्याबद्दल तालिबान प्रशासनाचे कौतुक केले.

जयशंकर म्हणाले की, सीमापार दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी समान धोका आहे आणि त्याविरुद्ध समन्वित प्रयत्नांची गरज आहे. तालिबानच्या सत्ताग्रहणानंतर भारत सतत हे स्पष्ट करत आला आहे की, अफगाण भूमीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये.

जयशंकर म्हणाले, ‘आपला दौरा भारत-अफगाण संबंध पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि दोन्ही देशांमधील टिकाऊ मैत्रीचे प्रतीक आहे. शेजारी आणि अफगाण जनतेचा शुभचिंतक म्हणून भारताला तुमच्या विकासात आणि प्रगतीत स्वारस्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.

‘दोन्ही देश विकास आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहेत. मात्र, सीमापार दहशतवाद हा दोघांनाही समान धोका आहे आणि त्यावर एकत्रितपणे मात करणे आवश्यक आहे. भारत-अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्याचे पूर्ण समर्थन करतो. दोन्ही देशांमधील सहकार्य तुमच्या राष्ट्रीय विकासाला तसेच प्रादेशिक स्थैर्याला बळकटी देतो. या पार्श्वभूमीवर मला आनंद होत आहे की भारत काबूलमधील ‘तांत्रिक मिशन’ला दूतावासाचा दर्जा देत आहे,” असे त्यांनी घोषित केले.

खनिज उत्खननासाठी भारतीय कंपन्यांना परवानगी

अफगाणिस्तानने भारतीय कंपन्यांना खनिज उत्खननाच्या संधी शोधण्यासाठी आमंत्रित केले आणि या प्रस्तावावर पुढील चर्चा होऊ शकते, असे सांगितले. व्यापार वाढविण्यात आपले सामायिक हित आहे. काबूल आणि नवी दिल्ली दरम्यानच्या नव्या संबंधांची चांगली सुरुवात झाली आहे, ही आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले.

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती

मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षेबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांना चिंता

'पंतप्रधान धन-धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ; ४२ हजार कोटींची योजना

अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव; देशभरातून संताप