अयोध्या : अयोध्येत राममंदिराची उभारणी होऊन रामलल्लाची मूर्ती स्थापन झाल्यानंतर प्रथमच येणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी (१७ एप्रिल) अयोध्यानगरी सजली असून रामलल्लाचा दरबार भाविकांच्या दर्शनासाठी २० तास खुला राहणार आहे. रामनवमी उत्सवासाठी देश-विदेशातून सुमारे १५ लाख भाविक अयोध्येत येणार असल्याचा अंदाज असून, याकाळात चार दिवस ‘व्हीआयपी’ दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, रामलल्लाची शृंगार आरती पहाटे ५ वाजता होणार आहे. दर्शन आणि सर्व पूजा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. वेळोवेळी, परमेश्वराला प्रसाद अर्पण करण्यासाठी थोडा वेळ पडदा काढला जाईल. मंगला आरतीनंतर ब्रह्म मुहूर्तावर दुपारी साडेतीन वाजता रामलल्लाचे दर्शन सुरू होईल. रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनादरम्यान रामलल्लांचा अभिषेक आणि शोभाही सुरू राहणार आहे. इतर दिवशी सकाळी ६:३० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत भाविक राम मंदिरात जातात. रामनवमीच्या दिवशी राम मंदिर आणखी ५ तास खुले राहणार आहे.
रामनवमीच्या दिवशी रात्री ११ नंतर मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी असेल तर दर्शनासाठी वेळ वाढवण्याचा विचार केला जाईल,असे चंपत राय यांनी सांगितले. श्रीराम जन्मभूमी मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. अयोध्या शहरात जवळपास १०० ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. रामनवमी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण प्रसारभारती आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रद्वारे केले जाईल. ट्रस्टने राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर, बिर्ला धर्मशाळेसमोर, सुग्रीव किल्ल्याच्या खाली भक्तांसाठी मदत शिबिरे उभारली असून, कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास भाविक तिथे जाऊन मदत मागू शकतात, असे चंपत राय यांनी सांगितले.