लखनऊ : अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील संशयित आरोपी, एका प्राथमिक शिक्षकाच्या घरातून २० लाख रुपयांची रोकड, परदेशी चलन आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या कारभारावर आणि सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी अविनाश शुक्ला हा संशयित आरोपी आहे. तो राम मंदिराच्या देणगी मोजणी विभागात कार्यरत होता. एका सामान्य उत्पन्नाच्या व्यक्तीने अवघ्या काही महिन्यांत एवढी अफाट संपत्ती कशी गोळा केली, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.
२० लाखांची रोकड
अयोध्येतील 'श्याम साधन योग केंद्र'शी संबंधित लोकांच्या मते, अविनाशची पार्श्वभूमी अत्यंत सर्वसामान्य आहे. तो एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत असून त्याचा मासिक पगार केवळ १४,००० ते १५,००० रुपये होता. या वर्षाच्या मार्च महिन्यात राम मंदिराच्या देणगी मोजणी विभागात रुजू होण्यापूर्वी तो हनुमान गुहेजवळ पाणी विकण्याचे काम करायचा. अटक करण्यात आलेल्या ८ संशयितांमध्ये अविनाशच्या घरातून सर्वाधिक, म्हणजेच २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
प्रत्यक्षदर्शींचा दावा
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार सेवादार सुंदरलाल यांनी सांगितले की, ५ जून रोजी चार पोलीस कर्मचारी आणि ट्रस्टशी संबंधित काही लोक अविनाशला कौशालपुरी येथील 'श्याम साधन योग केंद्रा'तील त्याच्या खोलीवर घेऊन आले होते. सुंदरलाल यांच्या सांगण्यानुसार, एका चावीने ट्रंक उघडून दोन बॅगा बाहेर काढण्यात आल्या आणि त्यानंतर तिथल्या सर्वांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. नंतर त्यांना समजले की अविनाशकडून सुमारे २० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
ट्रस्टची महत्त्वाची बैठक
आगामी ६ जुलै रोजी 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'च्या १५ सदस्यीय समितीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत ट्रस्टची पुनर्रचना करणे, संतांचे प्रतिनिधित्व वाढवणे आणि काही ठरावीक पदाधिकाऱ्यांच्या अधिकार व जबाबदाऱ्यांचा आढावा घेण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, गोपाल राव यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या भविष्यातील भूमिकेवरही या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो.