६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्राणज्योत मालवली. आज (दि.६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाणदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X च्या माध्यमातून म्हटले, "महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन! न्याय, समानता आणि घटनावादाच्या मूल्यांप्रती त्यांची निष्ठा आणि दूरदर्शी नेतृत्व आजही राष्ट्राच्या प्रवासाला दिशा देत आहे."
विकसित भारताच्या प्रवासात आंबेडकरांचा आदर्श महत्त्वाचा
पुढे ते म्हणाले, "मानवी प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आंबेडकरांनी दिलेली प्रेरणा अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरली आहे. 'विकसित भारत' उभारण्याच्या प्रवासात त्यांचे आदर्श आमच्या वाटचालीला सदैव प्रकाश देत राहो.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचा मूलमंत्र मानणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांनी श्रमिक, शेतकरी आणि वंचित घटकांना अधिकार बहाल करून सामाजिक न्यायाचा सर्वोच्च आदर्श प्रस्थापित केला."
बाबासाहेबांचा वारसा प्रत्येक भारतीयासाठी लोकसेवेचा आदर्श
पुढे ते म्हणाले, "समता आणि बंधुतेच्या आधारावर सक्षम भारताची पायाभरणी करत त्यांनी राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर अमिट छाप सोडली. समुद्रासारखे विराट व्यक्तिमत्त्व आणि हिमालयासारखे उंच कार्य असणाऱ्या बाबासाहेबांचा वारसा प्रत्येक भारतीयासाठी लोकसेवेचा महान आदर्श आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कृतज्ञ राष्ट्राकडून विनम्र अभिवादन.