राष्ट्रीय

...म्हणून 'त्या' CEO ने केली पोटच्या लेकाची हत्या, कारण ऐकून बसेल धक्का

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Rakesh Mali

सूचना सेठ या एआय स्टार्टअपची सीईओ असलेल्या महिलेने स्वतःच्याच चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी आता नवनवीन खुलासे होत आहेत. सूचनाला आपल्या विभक्त पतीपासून लाखोंची पोटगी हवी होती. तसेच, पतीने मुलाला भेटू नये यासाठी ती गोव्याला गेली आणि तेथेच मुलाची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

महिन्याला हवी होती अडीच लाख रुपयांची पोटगी-

मिळालेल्या माहितीनुसार, सूचना हिला पती वेंकटरमणकडून महिन्याला अडीच लाख रुपये पोटगी हवी होती. पतीचे वार्षिक उत्पन्न हे 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचा तिचा दावा होता. तसेच, तिने पतीवर मारहाण केल्याचे देखील आरोप केले होते. वेंकटरमण यांनी सूचनाच्या मारहाणीच्या आरोपांचे खंडन केले होते. कोर्टाने त्यांना सूचनाच्या घरी जाण्यास मनाई केली होती. पण, रविवारी पत्नीच्या घरी जाऊन मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती.

मीडियारिपोर्टनुसार, रविवारी वेंकटरमण हे आपल्या मुलाला भेटायला येणार होते. मात्र, या भेटीला सूचनाचा विरोध होता. त्यामुळे तिने गोवा जाण्याचा बेत आखला. काहींच्या मते तोपर्यंत वेंटकरमण इंडोनेशिया रवाना झाले होते. सूचनाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करुन ते आपल्या मुलाशी बोलले होते. याच गोष्टीचा राग आल्याने तिने पोटच्या मुलाला संपवले.

असा आला नात्यात दुरावा-

सूचना आणि वेंकटरमण यांनी 2010 साली प्रेमविवाह केला होता. त्यांना 2019 मध्ये मुलगा झाला. याकाळात दोघांमध्ये मतभेद व्हायला लागले. अद्याप दोघांचा घटस्फोट झाला नसला तरी यासाठीचा अर्ज कोर्टात दाखल आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत सूचना यांच्याकडे मुलाचा ताबा देण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

एका एआय स्टार्टअपची सीईओ असलेल्या सूचना सेठ (३९) हिने स्वतःच्याच चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. गोव्यामध्ये मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये कोंबून कॅबमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. सूचनाने शनिवारी उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलासह चेक-इन केले होते आणि सोमवारी सकाळी एकटीनेच चेक आउट केले होते. हाऊस-कीपिंग कर्मचार्‍यांपैकी एक कर्मचारी सोमवारी अपार्टमेंट साफ करण्यासाठी गेला असता त्याला काही रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने गोवा पोलिसांशी संपर्क साधला आणि कळंगुट पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आरोपी हातात बॅग घेऊन तिच्या मुलाशिवाय हॉटेलमधून जाताना दिसल्याने या घटनेचा खुलासा झाला.

गोवा पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क साधला आणि सूचनाशी फोनवर बोलून तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा मुलाला गोव्यातील फातोर्डा येथील मित्राकडे सोडल्याचे तिने सांगितले. तिची उत्तरे संशयास्पद वाटली. त्यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाला पुन्हा फोन केला, यावेळी त्याच्याशी कोकणीमध्ये बोलले आणि प्रवाशाला काहीही न सांगता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गाडी घेऊन जाण्यास सांगितले. तोपर्यंत टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली होती. चित्रदुर्गातील पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर कर्नाटक पोलिसांना मुलाचा मृतदेह तिच्या बॅगमध्ये सापडला आणि तिला ताब्यात घेतले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले