बंगळुरू : बंगळुरूच्या केआयए आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही व्यक्तींनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्समध्ये प्रतिक्रिया उमटत असताना कर्नाटकमधील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या शनिवार वाड्यात काही महिलांनी नमाज पठण केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हा मुद्दा संवेदनशील ठरला होता. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
विमानतळावर काय घडले?
सोशल मीडियावर या प्रसंगाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जवळपास १० ते १२ व्यक्ती विमानतळावरच नमाज पठन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी सीआयएसएफ अर्थात सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्सचे जवान जवळच उभे आहेत. यासंदर्भात बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला, तरी हा प्रकार विमानतळाच्या टर्मिनल २ आगमन गेट क्रमांक ३ जवळ घडल्याची माहिती समोर आली आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक भाजपाने सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली आहे. कर्नाटक भाजपाचे प्रवक्ते विजय प्रसाद यांनी काँग्रेसप्रणीत राज्य सरकार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री प्रियांक खर्गे यांना टॅग करून टीका करणारी सोशल पोस्ट केली आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तींनी तिथे नमाज पठन करण्याची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न भाजपाने केला आहे.
भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ वर हा सगळा प्रकार होऊ तरी कसा दिला गेला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री प्रियांक खर्गे, तुम्ही याची परवानगी दिली होती का, विमानतळाच्या अतीउच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे नमाज पठन करण्याची पूर्वपरवानगी या व्यक्तींनी घेतली होती का, असे सवाल विजय प्रसाद यांनी केले आहेत. प्रशासनाकडून पूर्वपरवानगी घेऊन काढण्यात येणाऱ्या पथसंचलनाला सरकारकडून आक्षेप घेतले जातात आणि प्रतिबंधित ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांकडे डोळेझाक का केली जाते, या प्रकारामुळे अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत नाही का, असाही सवाल प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.
गेटबाहेर नमाज पठण
केआयएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टर्मिनल २ मध्ये प्रार्थनेसाठी वेगळी जागा आहे. मात्र, संबंधित गटाने विमानतळाच्या गेटच्या बाहेर नमाज पठण केले. केआयए पोलीस स्थानकावरील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता विमानतळ परिसर आमच्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत नसून तिथे घडल्या प्रकाराविरोधात कुणीही तक्रार दाखल केलेली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.