बंगळुरू : बंगळुरूमध्ये एका ४५ वर्षीय कॅबचालकाने पत्नी आणि तिच्या माहेरच्या सहा नातेवाईकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैवाहिक वादातून त्याने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आरोपीने सातही जणांच्या डोक्यावर वरवंट्याने प्रहार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. यामध्ये सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. हत्येनंतर मृतदेह कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा संशय असून, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पत्नीच्या माहेरचे संसारात हस्तक्षेप करतात म्हणून...
पोलिसांच्या माहितीनुसार, शेखर उर्फ इंदुशेखर असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो बंगळुरूमधील राजाजीनगर परिसरात राहत होता. शेखर आणि सुनीता यांच्या लग्नाला जवळपास २० वर्षे झाली होती. मात्र, त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीच्या माहेरचे त्यांच्या संसारात हस्तक्षेप करतात आणि वादाच्या वेळी सुनीताची बाजू घेतात, असा शेखरचा समज होता. याच रागातून त्याने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
एकेकाला घरी बोलावले अन्...
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, १७ ऑक्टोबरच्या सुमारास शेखरने वेगवेगळी कारणे सांगून पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरी बोलावले. सुरुवातीला पत्नी सुनीताची, त्यानंतर मेहुणे शिवकुमार आणि शंकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. पुढे सासू रूपावती नंतर रूपावती यांच्या सुना दिव्या आणि नलिनी, तसेच सात वर्षांचा पुनित यांचाही त्याने जीव घेतल्याचा संशय आहे.
शेखरने हत्यांसाठी स्थानिक भाषेत 'ओरालू कल्लू' किंवा 'रुब्बू गुंडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक दगडी वाटण्याच्या साधनाचा वापर केल्याचा आरोप आहे. त्याने कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावर वरवंट्याने प्रहार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?
हत्यांनंतर शेखरने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. पत्नी सुनीता बेपत्ता झाल्यानंतर शेजाऱ्यांना ती मैत्रिणीसोबत बाहेर गेल्याचे त्याने सांगितल्याची माहिती आहे. तसेच तिचा फोन बंद असल्याचेही सांगितले होते.
घरातील रक्ताचे डाग त्याने रसायनांच्या मदतीने स्वच्छ केल्याचा आरोप शेखरवर आहे. हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेले दगडी साधनही स्वच्छ केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर मृतदेह कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे. काही मृतदेह चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी फेकल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारीनंतर प्रकरण उघड
दिव्या आणि नलिनी यांच्या आईंनी ३ नोव्हेंबर रोजी श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीदरम्यान शेखरवर संशय बळावला आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून या हत्याकांडाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. हत्यांची घटना राजाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपास त्या पोलिसांकडे सोपवण्यात आला.
एका मुलाचा मृतदेह सापडला
पोलिसांनी मृतदेहांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहेत. या शोधमोहिमेदरम्यान सात वर्षांच्या पुनितचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे. इतर सहा जणांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी आरोपीची कार आणि काही अन्य वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्याकांडामागील नेमके तपशील आणि पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत.