राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी (दि. १०) संध्याकाळी मोठा स्फोट झाल्याने सुरक्षाव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या स्फोटानंतर केवळ राजधानीच नव्हे, तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांमध्येही उच्च सतर्कता (High Alert) जाहीर करण्यात आली आहे. तसेच, बिहार आणि कोलकातामध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था
FPJ ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले. रेल्वे स्थानक, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे यासारख्या गर्दीच्या आणि संवेदनशील भागात गस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी केली जाईल आणि संशयास्पद व्यक्तींची तपासणी केली जाईल. कोणत्याही संभाव्य धोक्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना त्यांच्या ग्राउंड इंटेलिजेंस नेटवर्कचा पूर्ण वापर करण्यास सांगितले आहे.
उत्तर प्रदेशमध्येही हाय अलर्ट
उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्ली-एनसीआर जोडलेल्या सर्व शहरांमध्ये विशेष गस्त सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्व धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अयोध्या आणि मथुराच्या प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. वाराणसी काशी विश्वनाथ मंदिराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे
दहशतवादाचा संशय
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांनी ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान संभाव्य दहशतवादी नेटवर्कमधील काही संशयितांना अटक केली होती. त्यामुळे या स्फोटाकडे दहशतवादी कारवाईच्या शक्यतेने बघितले जात आहे.